सासुरे – बार्शी तालुक्यातील तीर्थक्षेत्र सासुरे येथे श्री महांकाळेश्वर यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य महांकाळेश्वर केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या रामा कांबळे यांनी मानाच्या महांकाळेश्वर केसरी किताबावर आपले नाव कोरले. अटीतटीच्या लढतीत अकलूजच्या करण मिसाळ यांच्यावर गुणांच्या आधारे मात करीत कांबळे यांनी एक लाख रुपयांचे पारितोषिक आणि मानाची चांदीची गदा पटकावली.
कार्तिक पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या श्री महांकाळेश्वर यात्रेच्या पहिल्या दिवशी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत सूर्योदयाच्या साक्षीने सगुण-साकार परमेश्वराचा अवतार मानल्या जाणाऱ्या टोपाचा छबिना निघाला. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. दिवसभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी यात्रेचा उत्साह द्विगुणित केला.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्री महांकाळेश्वर सार्वजनिक कुस्ती कमिटीच्यावतीने कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानाचे उद्घाटन शशिकांत पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल बारंगुळे, दीपक पाटील, सुनील बारंगुळे, वैभव सातपुते, आनंद करंडे, उदय आवारे, दिनेश करंडे, तुषार आवारे, नागेश आवारे आदी उपस्थित होते.
मैदानातील सर्वाधिक प्रतिष्ठेची आणि मानाची महांकाळेश्वर केसरी कुस्ती पुण्याचा रामा कांबळे आणि अकलूजचा करण मिसाळ यांच्यात रंगली. दोन्ही मल्लांनी एकमेकांच्या डावपेचांना चोख प्रत्युत्तर देत तब्बल ३७ मिनिटे झुंज दिली. ताकद, चपळाई आणि कुस्ती कौशल्याचा अप्रतिम संगम असलेल्या या लढतीने मैदानात चांगलीच रंगत आणली. अखेर गुणांच्या आधारे पंचांनी कांबळे यांना विजयी घोषित केले. महांकाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व मार्गदर्शक डॉ. अजय करंडे यांच्या हस्ते कांबळे यांना एक लाख रुपयांचे पारितोषिक आणि मानाची चांदीची गदा प्रदान करण्यात आली. यावेळी माजी सरपंच तात्यासाहेब करंडे, उद्योजक प्रशांत भारती, वस्ताद अशोक करंडे, शहाजी नेमाने, बालाजी आवारे आदी उपस्थित होते.
दुसऱ्या क्रमांकासाठी कोल्हापूरचा विक्रम गायकवाड आणि कंदरचा हनुमंत काळे यांच्यात झालेली ७५ हजार रुपयांची कुस्ती काळे यांनी जिंकली. तृतीय क्रमांकासाठी आटपाडीचा सचिन काळे आणि कंदरचा संकेत शिंदे यांच्यात लढत झाली. या कुस्तीत शिंदे यांनी बाजी मारत ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले. चौथ्या क्रमांकासाठी पुण्याचा सूरज मगर आणि कोल्हापूरचा दादा नाईकवाडे यांच्यात झालेल्या लढतीत मगर यांनी विजय मिळवत ४१ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.
सुमारे सहा तास रंगलेल्या या कुस्ती मैदानात राज्यभरातून आलेल्या नामांकित मल्लांसह लहान-मोठ्या गटांतील अनेक चुरशीच्या कुस्त्या पार पडल्या. मल्लांच्या दमदार कामगिरीला कुस्तीशौकिनांनी उत्स्फूर्त दाद दिली. यात्रेतील कुस्ती मैदानाने सासुरेच्या धार्मिक परंपरेला मर्दानी खेळाच्या उत्साहाची जोड दिली. स्पर्धेचे समालोचन अनिल धोत्रे यांनी केले.
Views: 10