मंगळवेढा – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन येथे जिल्ह्यातील दुष्काळ व पाणीटंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आमदार आवताडे यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
पीकविमा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मांडणार
पीकविम्याचे अनेक अर्ज प्रलंबित असून काही शेतकऱ्यांचे अर्ज नाकारण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. हा प्रश्न मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणाऱ्या स्वतंत्र बैठकीत मांडून मार्गी लावण्याचे निश्चित करण्यात आले.
भूजल पातळी वाढविण्यासाठी जलसंधारणावर भर
दरवर्षी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात असल्याने भूजल पातळीत अपेक्षित वाढ होत नाही. त्यामुळे भूजल सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण करून जलसंधारणाच्या कामांसाठी योग्य उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून दक्षिण भागातील गावांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा आणि शेतकऱ्यांची पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणीही करण्यात आली.
टँकरचे फीडिंग पॉइंट वाढविण्याची मागणी
मंगळवेढा तालुक्यात दुष्काळाची तीव्रता अधिक असून अनेक वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. टँकरची आवश्यकता असतानाही पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे टँकरचे फीडिंग पॉइंट वाढवून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आमदार आवताडे यांनी केली.
केशरी शिधापत्रिकाधारकांना ऑफलाइन धान्य वितरण करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केशरी शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. मात्र, ऑनलाइन नोंदणी नसलेल्या लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी डिसेंबर महिन्यात ऑफलाइन पद्धतीने धान्य वितरण करण्याची विनंती करण्यात आली.
चारा छावण्या सुरू करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
दुष्काळामुळे पशुपालकांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा आणि संगोपनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मंडळनिहाय चारा छावण्या तातडीने सुरू करण्याबाबत पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच पशुगणनेसाठी सुरू असलेल्या टॅगिंग प्रक्रियेत मतदारसंघातील पशुधनासाठी ३० ते ३५ हजार टॅग कमी पडत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर तातडीने टॅग उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
भोसे पाणीपुरवठा योजनेच्या पंप दुरुस्तीसाठी निधीची मागणी
भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या उचेठाण येथील जॅकवेलमधील बंद असलेले दोन पंप दुरुस्त करण्यासाठी टंचाई निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच जागेअभावी रखडलेला उचेठाण येथील मंजूर सोलर प्रकल्प जुनोनी येथे सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेता नागरिकांना पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांना दिलासा आणि पशुधनाला चारा उपलब्ध करून देणे ही आपली प्राथमिकता आहे. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.