सोलापूर – जिल्ह्यातील गावागावांतील अस्वच्छ ठिकाणे शोधून त्यांची स्वच्छता करण्याबरोबरच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सुरुवात झाली आहे. केवळ शासकीय यंत्रणेपुरते मर्यादित न ठेवता लोकचळवळीच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे शाळा, मंदिरे, समाजमंदिरे, रस्ते आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेत ग्रामस्थांचा सहभाग वाढविला जाणार आहे.
स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत’ या संकल्पनेतून अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. स्वच्छतेसोबतच कचऱ्याचे वर्गीकरण, योग्य संकलन आणि त्यातून उपयुक्त संसाधननिर्मिती करण्यावर भर दिला जाणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कृती आराखड्यानुसार तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेत विभागप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांच्या बैठकीत अभियानाची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांसह महिला बचत गट, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि माजी सैनिकांनीही अभियानात सहभागी होऊन गावाच्या स्वच्छतेत योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट
अस्वच्छ ठिकाणांचे मॅपिंग करून कृती आराखडा
तालुक्यातील वर्दळीची, अस्वच्छ आणि नागरिकांना अडचणीची ठरणारी सार्वजनिक ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत. या ठिकाणांचे मॅपिंग करून प्राधान्यक्रम ठरविण्यात येईल. त्यानंतर संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून निश्चित कालावधीत स्वच्छता पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ एक दिवस स्वच्छता करण्याऐवजी समस्येच्या मुळावर उपाय करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
चौकट
शाळांमधून स्वच्छतेचे धडे
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय आणि पर्यावरणाबाबतची जाणीव निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. घनकचरा व्यवस्थापन केंद्रांना भेटी, स्वच्छता व जलसंधारण विषयक संवाद तसेच क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षारोपणालाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.
Post Views: 8