कुर्डुवाडी – नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर अवघ्या १०० दिवसांतच राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. “थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी शहर विकासाचा एकही विषय पटलावर न घेता केवळ नागरिकांची दिशाभूल सुरू केली असून, त्यांची कामगिरी शून्य आहे,” असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी (अजित पवार गट) व रिपाईचे गटनेते समीर मुलाणी यांनी केला आहे.
मंगळवारी उपनगराध्यक्षा सविता जगताप यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुलाणी बोलत होते. यावेळी आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप यांच्यासह सर्व सभापती व नगरसेवक उपस्थित होते.
६२ विषय दिले, पण एकही घेतला नाही
समीर मुलाणी म्हणाले की, नगरपरिषदेत राष्ट्रवादी व रिपाई युतीचे १३ उमेदवार निवडून आले असून स्पष्ट बहुमत आमच्याकडे आहे. मात्र, नगराध्यक्षा आमच्या गटाच्या नसल्यामुळे त्या आकसापोटी कामे रोखत आहेत. गेल्या दोन सभांमध्ये आम्ही १० प्रभागांतील ६२ महत्त्वाचे विषय दिले होते, मात्र त्यांनी एकही विषय अजेंड्यावर घेतला नाही. केवळ श्वान नसबंदी आणि करमाफी यांसारखे विषय घेऊन शहर विकासाला फाटा दिला जात आहे.
नगरसेवक पदरमोडून करत आहेत कामे
शहरातील वार्षिक टेंडर्स अद्याप फोडण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पथदिवे, पाण्याचे व्हॉल्व्ह, पाईपलाईन आणि घंटागाडी दुरुस्तीसाठी नगरसेवकांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागत आहेत. विशेष म्हणजे,सोलापुर डिपीओ यांना पत्र देऊनही नगराध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही मुलाणी यांनी यावेळी केला.
पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे:
रानावनात रस्ते– शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून रानावनातील रस्ते जिथे घरेही नाहीत अशा ठिकाणी जसे की तिथे आयटी पार्क होणार असल्यासारखे ४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
अनुंकपा भरतीवर संशय: चार विषय प्रलंबित असताना केवळ एकाच विषयाचा समावेश केल्याने संशय व्यक्त करण्यात आला.
आगामी २७ एप्रिलची सभा:
येत्या सभेतही नगरसेवकांचे विषय डावलले गेल्याने सर्व नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
यावेळी पाणीपुरवठा सभापती अमर माने, शिक्षण सभापती संजय टोणपे, आरोग्य सभापती डॉ. मोहसीन मकनू, नगरसेवक जगन्नाथ क्षीरसागर, आनंद कदम, वसीम मुलाणी, निवृत्ती गोरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष दत्ताजी काकडे, महेश गांधी, ॲड. हरिश्चंद्र कांबळे, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.


























