सोलापूर : प्रभाग क्रमांक १४ मधील हाय-लेव्हल पाण्याच्या टाकी परिसरातील अस्वच्छता आणि सुरक्षेच्या अभावाविरोधात अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी पाण्याच्या टाकीजवळ रांगोळी काढून तसेच टाकीला हार घालून प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला.
पाण्याच्या टाकी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा व अस्वच्छता असून, सुरक्षेचीही पुरेशी व्यवस्था नसल्याचा आरोप संस्थेने केला. याबाबत महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र त्यानंतरही स्वच्छतेची कार्यवाही न झाल्याने हे आंदोलन करण्यात आले.नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरविणे ही महापालिकेची मूलभूत जबाबदारी आहे. पाण्याच्या टाक्यांच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
अध्यक्षा मीनल दास यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सरोजिनी मकाई, अरुणा जाधव, अनिता वाघमारे, जयश्री हिरेमठ, स्वाती घंटे, आफ्रीन पटेल, योगेश्री निंबाळे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले.
एका आठवड्यात पाण्याच्या टाक्यांच्या परिसराची स्वच्छता करून सुरक्षा व्यवस्था न केल्यास संपूर्ण शहरात महापालिकेविरोधात आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मीनल दास यांनी दिला.
—–
Post Views: 20