पंढरपूर – आपल्या दमदार अभिनयाने, संवेदनशील व्यक्तिमत्त्वाने आणि सामाजिक बांधिलकीने रसिकांच्या मनावर अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट नाना पाटेकर यांना कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी नाना पाटेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्राची मोठी हानी झाली असून, एक संवेदनशील आणि असामान्य कलाकार आपण गमावल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी कलासाधना सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत महाजन बडवे यांनी नाना पाटेकर यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. नानांचा अभिनय, त्यांची संवादफेक, सामाजिक विषयांकडे पाहण्याची त्यांची संवेदनशील दृष्टी आणि सर्वसामान्य माणसाशी असलेले त्यांचे घट्ट नाते यांचा त्यांनी भावपूर्ण उल्लेख केला.
“नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते, तर ते एक संवेदनशील माणूस आणि समाजाच्या वेदना आपल्या कलेतून मांडणारे महान कलाकार होते. त्यांच्या अभिनयाची जादू आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व कायमच रसिकांच्या स्मरणात राहील,” अशा भावना सिंहगड इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी व्यक्त केल्या.
ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप टोमके यांनी नानांच्या अभिनय पैलूचे वैशिष्ट्य विषद केले.
यावेळी अभियंता राजेंद्र माळी, डॉ. किरण बहिरवाडे, बाळासाहेब नवले राजकुमार शहा, अरिहंत कोठाडिया यांच्यासह कलासाधना सांस्कृतिक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी नाना पाटेकर यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाला अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.
नानांचा अभिनय अमर आहे… त्यांच्या भूमिका अजरामर आहेत… आणि त्यांच्या आठवणी सदैव आपल्या मनात जिवंत राहतील अशा भावना देखील यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
Post Views: 12