बार्शी – अल्पवयीन मुलीला दुचाकीवरुन शहरातील विविध ठिकाणच्या परिसरात नेऊन भेटणे, तिच्या मोबाईलवर संदेश पाठवणे तसेच तिचा वेळोवेळी पाठलाग केल्याच्या आरोपावरुन बार्शी शहर पोलीस ठाण्यात दोनजणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संशयित आरोपी अबक (नाव बदलेले) याला संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तो तिला मोटारसायकलवरुन बार्शी येथील विविध ठिकाणच्या परिसरात घेऊन जात असे, तसेच तिच्याशी मोबाईलवरुन संदेशाद्वारे संपर्क साधत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तो वेळोवेळी तिचा पाठलाग करीत असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
दुसरा संशयित आरोपी तथद (नाव बदलेले) याने संबंधित मुलीला, ‘तू माझ्याशीही अबक प्रमाणे भेट व बोल, अन्यथा तुझ्या घरी सर्व सांगेन,’ अशा आशयाची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच तो तिच्याशी फोनवर चॅटिंग करुन वेळोवेळी भेटत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७८ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ (पॉक्सो) कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि बाळासाहेब जाधव करीत आहेत.
Post Views: 10