बार्शी – शहराच्या शैक्षणिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, नगरपालिका शिक्षण मंडळ, बार्शी संचलित न.पा. शाळा क्रमांक २१ येथे इयत्ता १ ली ते १२ वीपर्यत इंग्रजी माध्यमाची (CBSE) स्वयंअर्थसहायित शाळा सुरु करण्यास सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे बार्शीच्या इतिहासात प्रथमच नगरपालिका संचलित CBSE इंग्रजी माध्यम शाळा सुरु होणार आहे.
या शाळेला मान्यता मिळावी यासाठी विधान परिषद आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने बार्शीकरांची अनेक वर्षांची अपेक्षा पूर्ण झाली आहे.
या निर्णयामुळे गोरगरीब, कष्टकरी, स्वच्छता कामगार, शेतकरी, मजूर तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्याना मोठा लाभ होणार आहे. महागड्या खासगी CBSE शाळांमध्ये प्रवेश घेणे आर्थिकदृष्टया शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांना आता नगरपालिका संचलित शाळेतच दर्जदार इंग्रजी माध्यमातील CBSE शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमामुळे बार्शीतील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक शिक्षणासाठी मोठ्या शहरांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार असून, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच बार्शीच्या शिक्षण, पायाभूत सुविधा आणि विकासाशी संबंधित विविध प्रश्नांसाठी यापुढेही शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करुन जनतेच्या हिताचे निर्णय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्यांचे त्यांनी सांगितले.