अक्कलकोट : केंद्र शासनाच्या दुष्काळ संहितेतील तांत्रिक निकषांमुळे दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून अक्कलकोट तालुका वगळला जाण्याची शक्यता असताना, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष बाब म्हणून अक्कलकोटचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करण्याची आग्रही मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत अक्कलकोटचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश झाल्याचे समोर आले आहे.
अक्कलकोट तालुक्यात सलग सुमारे २० दिवस पाऊस झाला नव्हता. त्यानंतर केवळ २.५ मिलिमीटर पाऊस झाला आणि पुन्हा सुमारे २० दिवसांचा पावसाचा खंड पडला. त्यामुळे २१ दिवसांच्या सलग पावसाच्या खंडाच्या तांत्रिक निकषामुळे तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळला जाण्याची स्थिती निर्माण झाली होती.
तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान, पावसातील दीर्घ खंड, खालावलेली भूजल पातळी तसेच तलाव व जलसाठे कोरडे पडल्याने गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर केवळ तांत्रिक निकषांचा आधार न घेता प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुके विशेष बाब म्हणून दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, अशी मागणी आमदार कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती.अक्कलकोटचा दुष्काळग्रस्त यादीत झालेला समावेश हा आमदार कल्याणशेट्टी यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची दखल मानली जात आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रतिक्रिया,
अक्कलकोट तालुक्यासाठी 20 व्या दिवशी फक्त 2.5 मिलिमिटरचा पाऊस हा दुष्काळी तालुक्यात समावेश व्हायला अडथळा येत होता. तो माझ्या मतदार संघासाठी अडचणीचा ठरणार होता. त्यासाठी विशेष बाब म्हणून नोंद घेण्याची मागणी केली होती त्याला यश आल्याने मला समाधान वाटले. आणि शासनाच्या सर्व दुष्काळी सवलती अक्कलकोट साठी सुद्धा मिळतील