बार्शी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती व महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त एकाद्याच्या घरातील विझलेला दिवा पुन्हा पेटवूया या संकल्पनेतून उडान फाउंडेशनने एक अनोखा व समाजोपयोगी उपक्रम राबवला.
बारंगुळे प्लॉट येथील एका गरजू कुटुंबाची अत्यंत हृदयद्रावक परिस्थितीसमोर आली. घरातील व्यक्तीला कॅन्सरसारखा गंभीर आजार झाल्यामुळे मोठा वैद्यकीय खर्च झाला असून, आजारपणामुळे दोघांनाही काम करता येत नाही. घरात दोन मुली असून त्यांचे शिक्षण सुरु आहे. अशा बिकट परिस्थितीत ११ हजार रुपयांचे वीज बिल थकले असल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे मुलींच्या अभ्यासात अडथळा निर्माण झाला होता.
ही परिस्थिती समजताच उडान फाउंडेशनने तात्काळ पुढाकार घेत, संबंधित कुटुंबाला ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करुन त्यांच्या घरातील विझलेला दिवा पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न केला. ही मदत १५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे देण्यात आली.
याचबरोबर, आंबेडकर जयंतीच्या औचित्य साधून गॅस सिलेंडर स्फोटात नुकसानग्रस्त अंकुश पवार (लाडोळे) यांच्या कुटुंबाला ३१०० रुपये आणि सोलापूर रोडवरील कॅन्सरग्रस्त व्यक्तीच्या उपचारासाठीही ३१०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
या उपक्रमाद्वारे समाजात मदतीची भावना वाढीस लागावी, तसेच गरजूंच्या घरातील अंधार दूर करुन आशेचा दिवा पेटवावा, हा उद्देश उडान फाउंडेशनच्या सदस्यांनी व्यक्त केला. कार्यक्रम प्रमुख उपस्थिती डॉ. गुलाब अंगारशा, माजी नगरसेवक कय्युम पटेल, ऍड. सरफराज मुजावर, सादीक मुल्ला, ऍड. रियाज बागवान, विवेक गजशिव, राहुल पाटील, किरण कोकाटे, नगरसेवक दास मस्के आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उडान फाउंडेशनचे अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष जाफर शेख, मुलाणी, सचिव जमील खान, सहसचिव अख्तर शेख, मोहसीन पठाण, साजन बागवान, समशेरखान पठाण, सादिक काझी, रियाज बागवान, अकिल मुजावर, रियाज बागवान शेख, एजाज शेख, मुन्ना बागवान, वसीम मुलानी, जावेद शेख, रॉनी सय्यद, यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन किरण कोकाटे यांनी तर आभार जमील खान यांनी मानले.

























