बार्शी – राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिवपदी प्रा.डॉ. सुधाकर बोकेफोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ते मुळचे बार्शीचे आहेत.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार, उपसचिव अशोक मांडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या पुर्नगठनास शासन मान्यता देण्यात आल्याबाबतचे परिपत्रकाद्वारे कळविले आहे. समितीची पुनर्रचना करण्यात आली असून त्यानुसार, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष म्हणून राज्यमंत्री छत्रपती संभाजीराजे भोसले असून सदस्य सचिवपदी प्रा.डॉ. सुधाकर जनार्दन बोकेफोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी तीन वर्षांसाठी ते सदस्य सचिव म्हणून कामकाज सांभाळणार आहेत.
नवनियुक्त सचिव डॉ. सुधाकर बोकेफोडे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन समितीचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी व्यवस्थापन तसेच मानव्यशास्त्रात पी.एचडी. केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, लेखन आणि जीवनकार्य हे केवळ इतिहासाचा भाग नाही, तर ते आजच्या आणि उद्याच्या भारतासाठी दिशादर्शक आहेत. चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या मूळ साहित्याचे जतन, संशोधन आणि व्यापक प्रसार करण्याचे काम सातत्याने करत आहोत. सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांची पेरणी समाजात दृढपणे व्हावी, हीच आमची भूमिका असून, पुढील पिढ्यांपर्यंत आंबेडकर विचार पोहोचवणे ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे, असे डॉ. सुधाकर बोकेफोडे म्हणाले.
























