सोलापूर – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत रुग्णवाहिका चालकांनी जाहीर केलेले कामबंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी चालक प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा करून वारीनंतर सर्व प्रलंबित मागण्यांवर तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर चालक संघटनेने हा निर्णय घेतला.
रुग्णवाहिका चालकांनी प्रलंबित वेतन, किमान वेतन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, महागाई भत्ता तसेच इतर सेवा विषयक मागण्यांसाठी आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, आषाढी वारीदरम्यान लाखो वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेवर कोणताही परिणाम होऊ नये, या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत चालकांनी आंदोलन मागे घेतले.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल निंबाळकर यांनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाचा मान राखून आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे सांगितले. वारीनंतर होणाऱ्या बैठकीत मागण्यांबाबत ठोस आणि सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने आश्वासनाची पूर्तता केली नाही, तर पुढील आंदोलनाची दिशा लवकरच जाहीर करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या निर्णयामुळे आषाढी वारीच्या काळात जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवा अखंड सुरू राहणार असून वारकरी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता वारीनंतर होणाऱ्या बैठकीत चालकांच्या वेतन व सेवाशर्तींच्या प्रश्नांवर प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे चालकांसह आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.
Post Views: 35