सोलापूर – श्री बृहन्मठ होटगी संचलित श्रीमद् वीरशैव गुरुकुल च्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही जंगम बटूंसाठी रुद्र अध्ययन, पौरोहित्य, ज्योतिष शिबिरास काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून उत्साहात व भक्तीभावाने प्रारंभ करण्यात आला. यावेळी नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या आशीर्वाचनातून काशी जगद्गुरु म्हणाले, या शिबिरामुळे जंगम बटूंच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या माध्यमातून पारंपारिक ज्ञान व संस्कृती जपण्याचे कार्य प्रभावीपणे पुढे जाणार असल्याचे सांगून जगद्गुरु नी विविध कला व ज्ञान आत्मसात करण्याचे आव्हान केले. यावेळी बोलताना नागणसूर महास्वामीजी म्हणाले, समाज उभारणीसाठी विद्या आवश्यक असून जंगम बटूंनी या शिबिराचा लाभ घेण्याचे सांगून या विद्येचे महत्त्व स्पष्ट केले. आपल्या प्रास्ताविकेतून संस्थेचे सचिव शांतया स्वामी यांनी शिबिराचे महत्त्व व जंगम बटूंचे जडणघडण याची भूमिका स्पष्ट केली.
महिनाभर चालणाऱ्या या शिबिरामध्ये जंगम भटूंना रुद्र अध्ययन, पौरोहित्य विधी, ज्योतिषशास्त्र, प्रवचन कौशल्य, संबळ वादन, योग अभ्यास यासारख्या विविध कलांचे प्रशिक्षण दिले जाते. या शिबिरात महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील जंगम बटू मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी वेदमूर्ती परमेश्वर शास्त्री, सिद्धया हल्लाळी स्वामी,प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी, सागर स्वामी, पंडित स्वामी, संदीप स्वामी, जगन्नाथ शास्त्री, महांतेश शास्त्री, यमनप्पा होटगोंड, ओंकार मुंडे, भुवनेश्वर म्हेत्री आदि परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमास जंगम बटू व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांतू स्वामी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर संदीप स्वामी यांनी आभार मानले.

























