पणजी – देशाला ‘विकसित भारत’ बनवण्याचे स्वप्न केवळ सरकारी योजनांनी नव्हे, तर सत्याची साथ देणाऱ्या डिजिटल मीडियाच्या योगदानाने पूर्ण होईल. माहितीच्या महापुरात वाहून न जाता डिजिटल मीडियाने नितिमत्ता आणि कर्तव्यभावनेची सांगड घालून राष्ट्र उभारणीत सक्रिय सहभागी व्हावे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्यावतीने पणजी येथील कला अकादमीत आयोजित तिसऱ्या ‘राष्ट्रीय महाअधिवेशनाचे’ उद्घाटन डॉ. सावंत यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ सावंत म्हणाले की, बातमी केवळ व्हायरल करण्यासाठी न देता त्यामागे सखोल संशोधन असावे. तुमची बातमी इतिहासाला साक्षी ठेवून भविष्याचा वेध घेणारी असायला हवी. तसेच, डिजिटल मीडिया संपादकांच्या विविध मागण्यांचे पत्र आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या अधिवेशनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने निलेश सांबरे (ग्रामसेवा),
डॉ. महुवा साहा (शास्त्रज्ञ), कमलाकांत तारी (गोवंश संवर्धन), गुरुप्रसाद पावसकर (आयुक्त, दिव्यांग संचालनालय), विकास देशमुख (आरोग्य सेवा), चित्रा क्षीरसागर (साहित्यिक), ग्रामविकास संस्था नागझरी, सातारा (जलसंधारण – संस्थात्मक पुरस्कार) यांसह कमलेश बांदेकर, दीपक नार्वेकर, नेहा आंग्रे गांवस, प्रकाश कुलकर्णी, माणिक शेडगे, प्रा. विशाल गरड, राधा खताळ, गोवर्धन दराडे, संतोष ठोंबरे, पोश गुप्ता, राजेंद्र अग्रवाल, आणि राजेंद्र पाठक यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात आयोजित परिसंवादात’पत्रकारितेचे बदलते टप्पे आणि आव्हाने’ या विषयावर ‘कोकणसाद’चे संपादक संचालक संजय ना. ढवळीकर यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय ॲड. संदीप कायदे, ॲड. नकुल पार्सेकर, सौमित्र देसाई यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. यानंतर महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी प्रकट मुलाखत घेतली. या सोहळ्याला समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आयुष्मान भारत योजनेचे डॉ. ओमप्रकाश शेटे, खासदार सदानंद तानावडे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, रामकृष्ण वेताळ, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक विकास भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी तर आभार सागर चव्हाण यांनी मानले.
























