बार्शी – तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अखेर गठीत करण्यात आली असून, ॲड. रणवीर राजेंद्र राऊत यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या शिफारशीच्या आधारे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी या समितीस अधिकृत मान्यता दिली आहे.
शासनाच्या कार्यपद्धतीनुसार गठीत करण्यात आलेल्या या समितीत अध्यक्षासह १० अशासकीय सदस्य तसेच २ शासकीय सदस्य अशा एकूण १२ सदस्यांचा समावेश आहे. समितीचे अध्यक्ष म्हणून ॲड. रणवीर राजेंद्र राऊत यांची निवड करण्यात आली असून, सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
समितीमध्ये संतोष बळीराम कांबळे, अर्चना विजय चव्हाण, राहुल नवनाथ जाधवर, नागनाथ मारुती आडसूळ, महेश भिमराव गोरे, शांतीकुमार शाहू चोबे, संतोष बळवंत पाटील, अविनाश प्रमोद वाघमोडे आणि हनुमंत महादेव जाधव यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे शासकीय सदस्य तर तहसीलदार, बार्शी हे सदस्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत विविध लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी, मंजुरी आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी या समितीकडे राहणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार लाभार्थी निवड प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार किंवा अपात्र लाभार्थी आढळल्यास समितीचे अध्यक्ष व अशासकीय सदस्य यांनाही शासकीय सदस्यांप्रमाणेच जबाबदार धरुन आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
बार्शी तालुक्यातील निराधार, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ पारदर्शक आणि वेळेत मिळावा, या उद्देशाने समितीची स्थापना करण्यात आल्याने या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.
Post Views: 4