बार्शी – येथे सुरु असलेल्या श्री भगवंत महोत्सवाच्या पाचव्या दिवशी सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले आणि गायिका बेला सुलाखे यांच्या सुरेल ऑर्केस्ट्राने उपस्थित बार्शीकरांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची सुरुवात “गणपती बाप्पा मोरया” या मंगल गाण्याने झाली. त्यानंतर “मेरे मन ये बता तू”, “मितवा”, “चुरा लिया है तुमने”, “चार दिनों का प्यार” यासारख्या लोकप्रिय गाण्यांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गायिका बेला सुलाखे यांनी विविध भावगीत, चित्रपट गीत आणि लावण्या सादर करत वातावरण रंगवले. विशेषतः “या रावजी बसा भाऊजी” या लावणीला प्रेक्षकांनी टाळ्या-शिट्यांनी दाद दिली.
सुदेश भोसले यांनी आपल्या खास शैलीत “अपनी तो जैसे तैसे”, “सारा जमाना”, “बचना ऐ हसीनों”, “दर्द-ए-दिल” यासारखी गाणी सादर करत प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडले. विशेष म्हणजे त्यांनी थेट प्रेक्षकांमध्ये उतरुन गायन करत वेगळाच अनुभव दिला.
तब्बल सव्वा नऊ ते बारा या कालावधीत जवळपास पावणे तीन तास त्यांनी नॉनस्टॉप हिंदी-मराठी गाण्यांची मैफल रंगवली. या सुरेल कार्यक्रमामुळे महिलांसह सर्व वयोगटातील नागरिकांनी नाचत-गात महोत्सवाचा आनंद लुटला.
भगवंत मैदानावरील संगीत मैफिलीत स्क्रीनवर त्या त्या चित्रपटाचे गाणे लगताच चित्रीकरण दाखवल्याने उपस्थित रसिक प्रेक्षकांचा उत्साह वाढत राहिला. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष ऍड. रणवीर राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य यांच्यासह विविध पदाधिकारी, मान्यवर, महिला, युवा वर्गाने विविध गाण्यांवार ठेका धरला. खऱ्या अर्थाने बार्शीकरांनी आजच्या कार्यक्रमचा आनंद लुटल्याचे दिसून आले.

























