सांगोला – केवळ शंभर टक्के गुण किंवा पदवी म्हणजे यश नव्हे तर समाजासाठी विधायक योगदान देत एक चांगला माणूस म्हणून घडणे हेच खरे यश आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते काशिनाथ भतगुणकी यांनी केले. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित आयुष्य घडविताना मी यशस्वी होणारच या एकपात्री प्रयोगात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, प्राचार्य चारुदत्त जगताप, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते लक्ष्मण पवार, ड्रीम फाउंडेशनचे संचालक सुरेश वाघमोडे उपस्थित होते.
प्रारंभी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले यांच्या प्रतिमेला व कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास काशीनाथ भतगुणकी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर संगमेश्वर पुजारी यांच्या शंखनादाने सुरू झालेल्या या संवादात्मक प्रयोगात बाप नारळी खोबरं, माय नारळाचं पाणी या गीताने सर्वजण भावुक झाले. यावेळी काशीनाथ भतगुणकी यांनी प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत त्यांच्या ‘पद्मश्री’ सन्मानासाठी शिफारस करण्याचा मानस व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.चारुदत्त जगताप, सूत्रसंचालन प्राधनाजी चव्हाण, आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा.शिवशंकर तटाळे यांनी केले. यशस्वीतेसाठी उत्सव विभाग प्रमुख नरेंद्र होनराव यांचे योगदान लाभले.
Views: 8