सोलापूर : विटा वाहून नेणाऱ्या एका भरधाव डंपरने शेतकऱ्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक शेतकरी जागीच ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना सोलापूर-बार्शी रस्त्यावरील कारंबा गावाजवळ आज सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित डंपर पेटवून दिल्यामुळे महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
धोंडाप्पा गुराप्पा जोडमोटे (वय ८० वर्ष , रा.कारंबा ,उत्तर सोलापूर ) असे जागीच ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे तर मल्लिनाथ हिप्परगी (वय ६० वर्ष , रा. सदर) असे गंभीर जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
धोंडाप्पा जोडमोटे आणि मल्लिनाथ हिप्परगी हे दोघे आज सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुचाकीवरून शेताकडे निघाले होते. कारंबा गावाच्या शिवारात असलेल्या मुनाळे शाळेसमोर पाठीमागून येणाऱ्या विटांनी भरलेल्या अनियंत्रित डंपरने (क्रमांक MH 20 BE 4266) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की धोंडाप्पा जोडमोटे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मल्लिनाथ हिप्परगी हे गंभीर जखमी झाले . दरम्यान ही अपघाताची माहिती समजताच कारंबा येथील शेकडो ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या मल्लिनाथ हिप्परगी यांना उपस्थित नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलवले. यादरम्यान अपघातानंतर संतप्त झालेल्या काही ग्रामस्थांनी संबंधित डंपर पेटवून दिला. त्यामुळे महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत डंपरची आग विझवली. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी अग्निशामकच्या पथकाने आग आटोक्यात आणली.तर ग्रामीणच्या पोलिसांनी जमावाला शांत केले. या अपघाताची नोंद सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Post Views: 19