बार्शी – महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाचा आणि कथित बनावट आवाजाचा वापर करुन माढा उपविभागातील बाह्यस्त्रोत (आऊटसोर्सिंग) काम मिळवण्यासाठी दबाव टाकल्याच्या प्रकरणात बार्शी शहर पोलिसांनी मुख्य संशयित शिरीष ताटे याला अटक केली आहे. आरोपीला बार्शी येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सोमवार दि. २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महावितरणचे कार्यकारी अभियंता राकेश ज्ञानदेव मगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ जून रोजी त्यांच्या मोबाईलवर प्रथम एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने “पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब बोलणार आहेत,” असे सांगितल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने पालकमंत्र्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत माढा उपविभागातील आऊटसोर्सिंगचे काम शिरीष ताटे यांना देण्याबाबत दबाव आणल्याचा आरोप आहे.
फिर्यादीनुसार, त्यानंतर शिरीष ताटे याने व्हॉट्सॲप कॉल करुन “पालकमंत्र्यांचा फोन आला होता ना, आता काम मला द्या, अशी मागणी केली. मात्र, शासकीय नियमांनुसारच कंत्राटे दिली जात असल्याचे सांगत कार्यकारी अभियंत्यांनी नकार दिल्यानंतर “काम दिले नाही तर पालकमंत्र्यांकडे तक्रार करुन नोकरी घालवीन, निलंबित करीन आणि आयुष्य उद्ध्वस्त करीन, अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या तक्रारीवरुन बार्शी शहर पोलिसांनी शिरीष ताटे व एका अज्ञात साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहितामधील संबंधित कलमे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
न्यायालयात सरकारी पक्षाने आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले मोबाईल, सिमकार्ड, व्हॉट्सॲप कॉलची माहिती, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), कथित बनावट आवाजाचा स्रोत, तांत्रिक उपकरणे तसेच इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली.
या काळात कथित बनावट आवाज तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) किंवा अन्य तंत्रज्ञानाचा वापर झाला होता का, आर्थिक व्यवहार झाले आहेत का, तसेच या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास करण्यात येणार आहे. या गाजलेल्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गणेश कुंभार करत आहेत.
Post Views: 17