सोलापूर : सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड परिसरातील सत्यसाईबाबा नगर येथे महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सोमवारी दुपारी सुमारे ४ वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत या परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होणे तसेच काही क्षणांतच पुन्हा सुरू होणे, अशा प्रकारे अनेक वेळा वीज ये-जा झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वारंवार वीजपुरवठा सुरू-बंद झाल्यामुळे परिसरातील अनेक घरांमधील लाईट, ट्यूबलाईट, फ्रिज, कुलर, पंखे, एलईडी टीव्ही, लॅपटॉप तसेच इतर इलेक्ट्रॉनिक व विद्युत उपकरणांचे नुकसान झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अचानक वीजपुरवठ्यात होणाऱ्या या चढ-उतारामुळे महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. काही घरांमध्ये उपकरणे बंद पडल्याने नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
विशेष म्हणजे, वादळ, जोरदार वारा किंवा पाऊस नसतानाही सत्यसाईबाबा नगर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही महावितरणच्या संबंधित कार्यालयाकडे तसेच तक्रार यंत्रणेकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र, वारंवार तक्रारी करूनही या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात महावितरणला अपयश आले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच वारंवार वीज येणे-जाणे आणि व्होल्टेजमध्ये होणारे चढ-उतार यामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावी लागत असून दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम होत आहे.सत्यसाईबाबा नगर हा मोठ्या लोकवस्तीचा परिसर असून येथे अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत. वीजपुरवठा ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक सुविधा असताना महावितरणकडून या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याऐवजी वारंवार लाईट बंद-चालू होत असल्याने आमच्या घरातील महागडी उपकरणे खराब होत आहेत. उपकरणांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल सत्यसाईबाबा नगरमधील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.या परिसरातील वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, फिडर, केबल तसेच अन्य विद्युत यंत्रणेची तातडीने तपासणी करून वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड कायमस्वरूपी दूर करावा, कमी-जास्त होणारा व्होल्टेजचा प्रश्न सोडवावा आणि वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार थांबवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आजच्या घटनेमुळे ज्या नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसानीची महावितरणने गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा व आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये
यापुढेही सत्यसाईबाबा नगर परिसरातील वीजपुरवठ्याची समस्या अशीच सुरू राहिल्यास नागरिकांच्या वतीने महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये आणि या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
—
Post Views: 19