सांगोला – सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे (ता.सांगोला) येथे दीक्षांत समारंभ व माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन संस्था विश्वस्त विश्वजीत दिलीपकुमार इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. बी.फार्मसी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ बॅचच्या विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र सूर्योदय समूहाचे अध्यक्ष अनिल इंगवले, सोलापूर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक सिताराम डुब्बल, संस्थेच्या अध्यक्षा अनिता दिलीपकुमार इंगवले, सचिवा सुवर्णा दिलीपकुमार इंगवले, विश्वस्त विश्वजीत दिलीपकुमार इंगवले, प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
जीवनातील एक शैक्षणिक टप्पा यशस्वी पूर्ण केल्याचा आनंद नव पदवीधरांनी जल्लोष करून साजरा केला. सेल्फी, फोटो याच्या माध्यमातून हे आनंदी क्षण त्यांनी साठवून ठेवले. कॉलेजच्या मदतीने विद्यार्थ्यांनी एकसारखी दीक्षांत गाउनची वेशभुषा केली होती. त्यांच्या कपडयांच्या रंगसंगतीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या विद्यार्थ्यांवर भर सभामंडपात त्यांचे शिक्षक, कुटुंबीय, मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू होता. हुबेहूब विद्यापीठसारखा दीक्षांत समारंभ कॉलेजने आयोजल्याबद्दल सर्व पालक व विद्यार्थ्यांनी संस्था वरिष्ठांचे व आयोजकांचे आभार मानले. माजी विद्यार्थी मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपले सह्याद्री मधील आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी उपस्थित आजी विद्यार्थ्यांना यशासाठी मार्गदर्शन केले. सह्याद्री सारखे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन, गुणवान व अनुभवी शिक्षक, निसर्गरम्य वातावरण, शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण व ऋणानुबंध इतर कोठेही दिसत नाही अशी प्रशंसा माजी विद्यार्थ्यांनी याप्रसंगी केली.