सोलापूर – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज अपात्र ठरलेल्या सहा माजी संचालकांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी दि. १६ नोव्हेंबर फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाने फेटाळलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची आवश्यक ती संपूर्ण तयारी माजी संचालकांनी केली आहे.
माजी संचालक रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय शिंदे, जयवंतराव जगताप, दिलीप माने, बबनराव आवताडे आणि सुरेश हसापुरे या सहा माजी संचालकांनी अॅड. गिरीश गोडबोले आणि अॅड. अभिजित कुलकर्णी यांच्या माध्यमातून कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. या याचिकेत सरकारच्या वतीने अॅड. तेजस कापरे, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने अॅड. ऋतुराज पवार आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने अॅड. भूषणकुमार वाळिंबे यांनी काम पाहिले.
सहकार कायदा कलम ८८ आणि ११० अनुसार झालेल्या कारवाईमुळे माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी अपात्र ठरविले होते. त्यांच्या या निर्णयावर माजी संचालकांनी विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे अपिल केले होते, त्या ठिकाणीही त्यांचे उमेदवारी अर्ज अपात्र करण्यात आले.
बँकेच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवारी १७ नोव्हेंबर दुपारी ३ पर्यंतची मुदत असणार आहे. सर्वोच्च न्यायालयात माजी संचालकांनी धाव घेतल्यानंतर या याचिकेवर कधी सुनावणी होणार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा काही परिणाम बँकेच्या निवडणुकीवर होणार का? या बद्दल उत्सुकता लागून राहिली आहे.
चौकट
खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी घेतला अर्ज मागे
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी निवडणुकीतून अर्ज माघारी घेतला आहे. कृषी पणन प्रक्रिया आणि दुग्ध विकास संस्था या दोन्ही मतदारसंघांतून दाखल केलेले उमेदवारी अर्ज सोमवारी मागे घेतले असल्याची माहिती उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली आहे. अर्ज काढून घेण्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या या निर्णयामुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

















