हदगाव – तालुक्यातील वाळकी फाटा परिसरात केदारनाथ पेट्रोल पंपाच्या पाठीमागील दगडाच्या खदानीत दि.१३ जानेवारी २०२६ रोजी आढळून आलेल्या तहसील कार्यालयातील महिला कर्मचारी कमल क्षीरसागर (वय ५५ ) यांच्या संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कमल क्षीरसागर या गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यानंतर खदानीत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. मृतदेहावर जखमेच्या खुणा आढळून आल्याचे समजते. त्यामुळे हा मृत्यू आत्महत्या नसून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक, दुर्दैवी व गंभीर स्वरूपाची असून चर्मकार समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
विशेष बाब म्हणजे, क्षीरसागर कुटुंबावर अवघ्या दोन महिन्यांत दुसरे मोठे दुःख कोसळले असून, यापूर्वी त्यांच्या मुलाचा आजाराने मृत्यू झाला होता. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे की, या प्रकरणाचा सखोल, निःपक्षपाती व पारदर्शक तपास तातडीने करावा. आवश्यक असल्यास CID किंवा विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच पोस्टमॉर्टम अहवाल व तपासाची माहिती वेळोवेळी सार्वजनिक करावी. जर तपासात घातपात सिद्ध झाला, तर दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी व मृत महिलेच्या कुटुंबीयांना न्याय व संरक्षण द्यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे इशारा देण्यात आला आहे की, जोपर्यंत या प्रकरणातील सत्य बाहेर येत नाही व दोषींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत समाजातील अस्वस्थता कायम राहणार असून, न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी संभा खंदारे, संतोष वाघमारे, विशाल घोडेकर, गजानन गंगासागर, चंद्रकांत सोनटक्के, छाया सूर्यवंशी, सुनिता क्षीरसागरे, ज्योती भिंगाने, सुवर्णमाला वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.


















