सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये कार्यरत कामगारांची मानसिक व शारीरिक पिळवणूक होत आहे. कामगारांना अपमानास्पद वागणूक दिली जात असून कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही अतिरिक्त काम करून घेतले जाते. मात्र, या कामाचा मोबदला दिला जात नसल्याचा आरोप करत कामगारांच्या समस्या सोडविण्याची मागणी महापालिका कामगार व समाज कल्याण समिती सभापती श्रद्धा पवार यांनी निवेदनाद्वारे महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडे केली आहे.
महापालिकेतील विविध खात्यांमध्ये तसेच पदाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली मोठ्या संख्येने कामगार कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकारी व काही पदाधिकाऱ्यांकडून कामगारांना हीन दर्जाची आणि अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे कामगारांच्या आत्मसन्मानाला धक्का बसून मानसिक तणाव वाढत आहे. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर कामगारांना जबरदस्तीने थांबवून अतिरिक्त काम करून घेतले जाते. या अतिरिक्त कामाचा कोणताही मोबदला अथवा भत्ता दिला जात नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. काम करण्यास नकार दिल्यास नोकरीवरून काढण्याची तसेच दंडात्मक कारवाईची धमकी दिली जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
कामगारांना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि निर्भय वातावरणात काम करता यावे, यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा. अतिरिक्त कामाचा योग्य मोबदला द्यावा, अपमानास्पद वागणूक थांबवावी आणि धमकावण्याचे प्रकार रोखावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
—
Post Views: 7