जालना : देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मारवाडी समाजाची लोकसंख्या कमी असली, तरी देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) या समाजाचे मोठे योगदान आहे. व्यापार-उद्योगासोबतच सामाजिक कार्यातही मारवाडी समाज नेहमीच अग्रेसर राहिला असून, संकटकाळात समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्याची परंपरा या समाजाने जपली आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी काढले.
अखिल भारतीय मारवाडी संमेलनाच्या जालना शाखेतील मारवाडी युवा मंच व मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने सोमवारी (दि. ९) रुख्मिणी गार्डन येथे आयोजित सर्वधर्मीय दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. अखिल भारतीय जैन श्वेतांबर सोशल ग्रुप फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष गौतमसिंह मुनोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. जुगलकिशोर भाला यांच्या हस्ते झाले.
यावेळी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष भास्कर दानवे, उद्योजक घनश्यामदास गोयल, माजी आमदार संतोष सांबरे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच जेपीसी बँकेचे अध्यक्ष सतीश पंच, जनसेवा ग्रुपचे उपाध्यक्ष नरेश गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पहाडे, नगरसेवक महावीर ढक्का, मनोज जोशी, ललित विजावत, मारवाडी संमेलनाचे प्रदेश महामंत्री सुदेश करवा, प्रदेश उपाध्यक्ष उमेश पंचारिया, शिवलाल राठी आदींची उपस्थिती होती.
गोरंट्याल पुढे म्हणाले की, देशाची लोकसंख्या सुमारे १४० कोटी असून, त्यामध्ये मारवाडी भाषा बोलणाऱ्या विविध समाजघटकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मारवाडी समाजाने व्यापार-उद्योगाच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी दिली असून, नैसर्गिक आपत्ती आणि संकटाच्या काळातही सामाजिक बांधिलकी जपत मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. जालना शहरातील मारवाडी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावून रामतीर्थ स्मशानभूमीच्या धर्तीवर तिचा विकास करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जालना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी २०५० पर्यंतचे नियोजन करण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२०० कोटी रुपये खर्चाच्या नवीन जलवाहिनी व जलशुद्धीकरण केंद्राच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शहरवासीयांना आठ दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आल्याची माहितीही गोरंट्याल यांनी दिली.
भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष भास्कर दानवे म्हणाले की, समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम मारवाडी समाज सातत्याने करीत आहे. सामाजिक समरसतेचा संदेश देणारा सर्वधर्मीय दीपावली स्नेहमिलनाचा उपक्रम मराठवाड्यातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.
मारवाडी संमेलनाचे जिल्हाध्यक्ष सुभाषचंद्र देविदान यांनी समाजबांधवांनी संघटित होऊन समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावेत, तसेच लोकसंख्या वाढीसाठीही सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केले. उपमहापौर राजेश राऊत यांनी मारवाडी समाजाच्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. महापौर वंदना मगरे यांनी मारवाडी समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत महानगरपालिकेचा सकारात्मक दृष्टिकोन असल्याचे स्पष्ट केले. माजी आमदार संतोष सांबरे, शिवनाथ राठी आणि शरद काबरा यांनीही मनोगत व्यक्त केले.
उद्घाटक डॉ. जुगलकिशोर भाला यांनी देशाच्या विकासात मारवाडी समाजाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत, समाजबांधवांनी संघटित होऊन सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. दीपावली स्नेहमिलनासारख्या उपक्रमांतून सामाजिक एकतेचा आणि समतेचा संदेश दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोप करताना गौतमसिंह मुनोत म्हणाले की, प्रामाणिकपणे व्यवसाय करून देशाच्या विकासात योगदान देणारा मारवाडी समाज सामाजिक बांधिलकीही जपतो. भूकंप, महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात समाजाने मोठ्या प्रमाणात मदतकार्य करून आपले सामाजिक भान सिद्ध केले आहे. समाजाच्या अधिक प्रगतीसाठी सर्वांनी संघटित होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात नगरसेवक विरेंद्रप्रकाश धोका यांनी मारवाडी समाजाच्या देशाच्या विकासातील योगदानाचा आढावा घेतला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानासंदर्भातील न्यायालयीन लढा जिंकून महानगरपालिकेची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सुरक्षित ठेवण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. शब्बीर अली उद्यानाची जागाही न्यायालयीन लढ्याद्वारे महानगरपालिकेच्या ताब्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शहरातील मारवाडी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून स्नेहमिलनाचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन मनीष तवरावाला यांनी केले, तर चेतन बोथरा यांनी आभार मानले.
यावेळी मारवाडी संमेलनाचे जिल्हा कार्याध्यक्ष गोविंदप्रसाद मुंदडा, स्वागताध्यक्ष संजय राठी, जनसेवा ग्रुपचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोतीवाला, महेश भक्कड, रमेशचंद्र अग्रवाल, शाम लखोटिया, विरेंद्र रूणवाल, उमेश बजाज, विष्णू चेचानी, विजय जैन, पवन जोशी, दिनेश बरलोटा, लक्ष्मीनारायण मानधना, राम सोमानी, अलकेश देविदान, निखिल तायल, सुशील खंडेलवाल, बालाप्रसाद भक्कड, दामोदर बजाज, दर्पण सकलेचा यांच्यासह मारवाडी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















