अकलूज – सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक शाळा, अकलूज येथे आज (१८ जुलै २०२६) जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी आगमन सोहळ्यानिमित्त भव्य ‘दिंडी पालखी सोहळा’ अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडला.
वारकरी संतांच्या अभिरूप पात्रांचे पूजन –
या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर (माऊली) कदम उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका कु. शेख मॅडम होत्या. यावेळी सर्व इयत्ता प्रमुख आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते पालखी पूजन आणि प्रतिमा पूजनाने झाली. याप्रसंगी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व अभिरूप पात्र साकारलेल्या विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताई, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत चोखामेळा यांच्या रूपातील बालसंतांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापिका कु. शेख मॅडम यांच्या हस्ते प्रमुख अतिथी ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर कदम सरांचा सन्मान करण्यात आला.
विठू नामाचा गजर आणि सांस्कृतिक सादरीकरण
या भक्तीमय सोहळ्यात प्रशालेतील विद्यार्थिनी कु. शताक्षी बोडके हिने ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग अत्यंत गोड आवाजात सादर केला. त्यानंतर प्रशालेतील सहशिक्षिका कु. थोरात मॅडम यांनी सुंदर गवळण व अभंग सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान केली होती. सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षिकांनी केलेल्या विठू नामाच्या गजरानी संपूर्ण प्रशालेचा परिसर दुमदुमून गेला होता.
भव्य पालखी मिरवणूक
यानंतर प्रशालेतून पालखीची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक स.मा.वि. प्राथमिक शाळा – सदुभाऊ चौक – महावीर स्तंभ – गांधी चौक – महावीर स्तंभ – सदुभाऊ चौक – स.मा.वि. प्राथमिक शाळा अशा मार्गाने काढण्यात आली. मिरवणुकीत भालदार, चोपदार आणि पोलीस वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या दिंडी सोहळ्यात इयत्ता ३ री व ४ थी चे विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षिका हरिनामाचा जयघोष करत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नयनरम्य ‘गोल रिंगण सोहळा’
मिरवणुकीनंतर प्रशालेच्या प्रांगणात अतिशय शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात ‘गोल रिंगण सोहळा’ पार पडला. यामध्ये सर्वप्रथम पताकाधारी, हातात तुळस घेतलेल्या विद्यार्थिनी, टाळकरी आणि विणेकरी यांनी रिंगण पूर्ण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी धाव, फुगड्या, अभंग आणि भजन सादर करत रिंगणाचा मनमुराद आनंद लुटला. शेवटी पालखीची मनोभावे आरती करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. मिसाळ सर यांनी केले. या सोहळ्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुंदर क्षणचित्र (छायाचित्र) फोटोग्राफर कादर शेख यांनी कॅमेऱ्यात कैद केले.
Post Views: 6