वेळापूर – “ही निवडणूक वसंत नाना देशमुख यांची नसून राजाभाऊ राऊत विरुद्ध मोहिते-पाटील अशी थेट लढत आहे. या निवडणुकीत राजाभाऊंना साडेपाचशेपेक्षा जास्त मते मिळतील आणि मोहिते-पाटलांचा दारुण पराभव होईल,” असा घणाघाती दावा भाजप माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडवे येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोहिते-पाटील गटावर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचे दौरे सुरू झाले

असून माळशिरस तालुक्यातील माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी पालकमंत्री जयकुमार गोरे, उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीमध्ये माळशिरस तालुक्यातील मतदारांची बैठक पार पडली.
आमदार सातपुते यांनी मोहिते-पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की, “उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मोहिते-पाटील मोबाईल हातात धरून बसले होते. मुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांचा फोन येईल आणि आपण अर्ज मागे घेऊ, अशी त्यांची अपेक्षा होती. पण मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला फोन का करावा? तुम्ही बँका आणि गोरगरिबांचे पैसे असणाऱ्या पतसंस्था लुटून खाल्ल्या आहेत, म्हणूनच तुम्हाला कोणी फोन केला नाही.”
राजाभाऊ राऊत यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत सातपुते म्हणाले की, “या जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी मिळून एकच संकल्प केला आहे, तो म्हणजे मोहिते-पाटलांचा या निवडणुकीत पराभव करायचा. हा पराभव एवढा मोठा असेल की, यापुढे पुन्हा कधीही विधान परिषदेची निवडणूक लढवण्याची त्यांची हिंमत होणार नाही.” तसेच, निकालानंतर अकलूजच्या विजय चौकात भव्य जल्लोष साजरा करण्यासाठी राजाभाऊंनी आतापासूनच सत्काराची वेळ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या सभेमुळे माळशिरस आणि संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, या निवडणुकीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार रामभाऊ सातपुते, आमदार समाधान आवताडे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, जिल्हा परिषद सभापती चेतनसिंह केदार-सावंत, सभापती सौ. संस्कृती सातपुते, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहाजीराजे तथा बाबाराजे देशमुख, बी. वाय राऊत साहेब, आप्पासाहेब देशमुख, राहुल आप्पा रेडे पाटील, दादासाहेब उराडे, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, माळशिरस आणि नातेपुते येथील नगरसेवक तसेच भाजप पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
* कोट :
“ज्या देवेंद्रजींनी संपलेली कुटुंबं उभी करण्याचं काम केलं, त्याच कुटुंबांनी देवेंद्रजींसोबत बेईमानी केली. त्यांनी दिलेल्या शब्दाचा अवमान केला, याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही.”
— जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर जिल्हा
Post Views: 17