बार्शी – येथील सुयश विद्यालयात नर्सरी, ज्युनियर के.जी. व सिनियर के. जी. च्या विद्यार्थ्यांचा ‘द बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. शिक्षणातील दर्जे दार पद्धतीमुळे विद्यालयाने बार्शीत वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विद्यार्थ्यांची निवड विविध निकषांवर करण्यात आली. उत्कृष्ट वाचन कौशल्य, गोष्टी सांगण्याची क्षमता, स्टोरी नंबर, रीडिंग स्किल्स, वैयक्तिक स्वच्छता तसेच शालेय उपस्थिती या बाबींचा सखोल आढावा घेऊन गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक शिवदास नलवडे यांच्या हस्ते मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका अलका जगताप, संबंधित वर्गांच्या शिक्षिका तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा अभिमान पाहण्यासारखा होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, आत्मविश्वास व चांगल्या सवयींची जडणघडण होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


















