सोलापूर : शहराचे ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यावरणीय वैभव असलेल्या श्री सिद्धेश्वर तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. तलावाचे जतन, संवर्धन आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी तयार करण्यात येत असलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम टप्प्यात असून, लवकरच तो मंजुरीच्या प्रक्रियेत दाखल होणार आहे. दरम्यान, प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीपैकी महापालिकेच्या वाट्याच्या ५० टक्के खर्चाची जबाबदारी श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थान समितीने उचलावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
सिद्धेश्वर तलाव हा सोलापूरच्या पर्यावरण आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे तलावाचे पुनरुज्जीवन दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून तांत्रिक प्रक्रिया, आवश्यक परवानग्या आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता केली जात आहे.तलावाशी धार्मिकदृष्ट्या जोडलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थान समितीनेही या प्रकल्पात आर्थिक सहभाग नोंदवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. महापालिकेच्या खर्चातील ५० टक्के हिस्सा उचलण्याबाबत समितीने सकारात्मक आणि ठोस निर्णय घेतल्यास प्रकल्पाच्या निधीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे, असे महापालिका पर्यावरण विभागाने म्हटले आहे.
सोलापूरकरांच्या भावनेशी जोडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महापालिका आणि देवस्थान समितीने समन्वयाने पुढाकार घेतल्यास सिद्धेश्वर तलावाचे रूप पालटण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
Post Views: 8