करकंब – ता.पंढरपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एसटी बसस्थानकाच्या पटांगणात मुख्य कार्यक्रम संपन्न झाला.डाॅ.बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन मध्यरात्री मध्यवर्ती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले.जय भीम व डाॅ.बाबासाहेबांच्या नामघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी विविध राजकीय पक्ष,संघटना यांचे पदाधिकारी,अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या शुभ हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.न्यू.इंग्लिश स्कूल करकंब येथेही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लहानपणापासून त्यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंतच्या दुर्मिळ अशा ४०० छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांचा संपूर्ण जीवनपट समोर येत होता.याप्रसंगी प्रशालेच्या वतीने विविध पुस्तकांच्या प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.
ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय,रामभाऊ जोशी हायस्कूल,अमोल पब्लिक स्कूल,आदर्श प्रशाला,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणीही डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.मैत्री साम्राज्य ग्रुपच्या वतीने वक्तृत्व व नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या.























