मोडनिंब – येथे आज पहाटे एकच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर पुतळा उभारणीनंतर रात्री दीडच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पुतळा उभारणीनंतर अवघ्या तासाभरातच करमाळा सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा, पंढरपूर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल आत्राम, कुर्डुवाडी पोलीस निरीक्षक अतुल मोहिते, टेम्भूर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने यांनी घटनास्थळी भेट दिली.
पहाटेपासूनच आरसीपी, दंगल नियंत्रण पथक व क्यूआरटी पथक बंदोबस्तात तैनात करण्यात आले.सकाळी दहाच्या सुमारास भीमसैनिक व सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गेल्या महिन्यात ग्रामपंचायत कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. यानंतर आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा याच परिसरात उभा केला गेला आहे.
दोन्ही महापुरुषांच्या या पुतळ्यांच्या स्वागतासाठी शहरवासीय व सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित असल्याने कोणताही वादविवाद उद्भवला गेला नाही.दरम्यान मोडनिंब ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत पणे पुतळा उभारल्या प्रकरणी अज्ञाता विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती मिळत आहे.
सर्व पक्षीय नेते, समाज बांधव उपस्थित
पुतळा उभारण्यात आल्याची माहिती मिळताच सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी हजेरी लावली. विविध समाजातील नागरिकांनी एकत्र येत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी एकोपा व शांततेचे दर्शन घडले असून सर्वांनी मिळून हा क्षण साजरा केला.


















