सोलापूर : ज्येष्ठ न्यूरोअनेस्थेसियोलॉजिस्ट, आणि इंडियन सोसायटी ऑफ अनेस्थेसियोलॉजिस्ट्स (ISA) मधील सक्रिय नेत्या डॉ. मनीषा डी. काटीकर यांची इंडियन सोसायटी ऑफ अनेस्थेसियोलॉजिस्ट्स (ISA) राष्ट्रीय उपाध्यक्ष (Vice President) म्हणून २०२६–२७ या कार्यकाळासाठी देशभरातील सदस्यांच्या भरघोस पाठिंब्याने निवड झाली आहे.
डॉ. काटीकर या बलवंत इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसर्जरी अँड इंटेन्सिव्ह ट्रॉमा केअर,( BINIT) सोलापूर येथे न्यूरोअनेस्थेशिया व न्यूरोक्रिटिकल केअर विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ISA मध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर उल्लेखनीय कार्य केले असून राष्ट्रीय गव्हर्निंग कौन्सिल सदस्य (२०२२–२५), कॉलेज ऑफ ISA च्या डीन, इंडियन जर्नल ऑफ अनेस्थेशिया (IJA) व PEAK च्या सहयोगी संपादक, ISA महाराष्ट्र राज्य शाखेच्या माजी अध्यक्षा, उपाध्यक्ष, सचिव, संपादक तसेच सोलापूर सोसायटी ऑफ अनेस्थेसियोलॉजिस्ट्सच्या माजी अध्यक्षा व सचिव म्हणून त्यांनी प्रभावी नेतृत्व केले आहे.
अनेस्थेशिया क्षेत्रातील शैक्षणिक प्रगती, प्रशिक्षण, रुग्णसुरक्षा आणि व्यावसायिक विकासासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या पुढाकाराने अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषद, कार्यशाळा, सीएमई आणि पदव्युत्तर शैक्षणिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यांनी १८० हून अधिक व्याख्याने व वेबिनार घेतले असून प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय ओरेशन्ससाठी त्यांना निमंत्रित वक्त्या म्हणून गौरविण्यात आले आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ISA प्रोफिशियन्सी पुरस्कार (ISACON २०१७, २०१९ व २०२१), रुक्मिणी पंडित पुरस्कार आणि COLS पुरस्कार यांसारख्या प्रतिष्ठित सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. काटीकर यांनी देशभरातील ISA सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले. ISA च्या शैक्षणिक उपक्रमांना अधिक बळकटी देणे, रुग्णसुरक्षा वृद्धिंगत करणे, युवा अनेस्थेसियोलॉजिस्ट्सना प्रोत्साहन देणे आणि संघटनेची एकजूट अधिक दृढ करणे यासाठी आपण पूर्ण समर्पणाने कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. मनीषा काटीकर यांच्या या राष्ट्रीय निवडीमुळे सोलापूर व महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Post Views: 6