पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर (अधिकारप्रदत्त स्वायत्त) आणि यशवंत विद्यालय, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कर्मवीरांच्या शैक्षणिक विचारांचा जागर विद्यार्थ्यांमध्ये व्हावा, त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी आणि सामाजिक समतेची मूल्ये रुजावीत, या उद्देशाने विविध उपक्रमांसह हा सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने कर्मवीर भित्तीपत्रक, रांगोळी स्पर्धा आणि भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित मॉडेल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कर्मवीर विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थी व प्राध्यापकांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्मवीर विद्याप्रबोधिनी, रयत शिक्षण संस्था, सातारा येथील कार्यकारी संचालक कमलाकर महामुनी यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट केली. ‘शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित असावे आणि विद्यार्थ्यांनी ज्ञानाची निर्मिती करणारे बनावे,’ हा कर्मवीरांचा विचार होता, असे त्यांनी सांगितले.
कमलाकर महामुनी पुढे म्हणाले की, ज्या ठिकाणी शासनाच्या शैक्षणिक सुविधा पोहोचल्या नव्हत्या, अशा ठिकाणी कर्मवीरांनी शाळा सुरू करून बहुजन समाजाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षण व्यवस्थेतील बदल समजून घेणे आणि त्याला सामोरे जाणे आवश्यक आहे. ज्ञानरचनावादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतः ज्ञानाची निर्मिती करावी. पालकांनीही विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांच्या शिक्षणाबाबत निर्णय घ्यावेत, असे महामुनी यांनी सांगितले.
दुसरे प्रमुख पाहुणे वसंतनाना देशमुख यांनी रयत शिक्षण संस्थेची वाटचाल कर्मवीरांच्या आदर्शातून सुरू असल्याचे सांगितले. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा कर्मवीरांनी पुढे नेला. या विचारांतून महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक जडणघडणीला दिशा मिळाली. रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत आहेत. कर्मवीरांच्या विचारांनी अनेक पिढ्या घडल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख वक्ते डॉ. प्रशांत देशमुख यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी आढावा घेतला. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. अनेक आव्हानांना त्यांनी धैर्याने सामोरे जाऊन शिक्षणाची चळवळ उभी केली. ‘कमवा आणि शिका’ योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. या योजनेत त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग केले.
कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्यात लक्ष्मीबाई पाटील यांनी समर्थपणे साथ दिली. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी जातिभेदाला आव्हान देत समानता, समता आणि माणुसकीची मूल्ये रुजविली. संत गाडगेबाबा आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. संत गाडगेबाबांनी कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याला मदत केली, असे डॉ. प्रशांत देशमुख यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचा सन्मान करणे ही रयत शिक्षण संस्थेची परंपरा असल्याचे सांगितले. कर्मवीरांनी मानवकेंद्री शिक्षणाला महत्त्व दिले. आजही संस्थेतील शिक्षक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून कर्मवीरांचा विचार पुढे नेत आहेत. ‘कमवा व शिका’ योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करण्याचे कार्य सुरू आहे. चांगले कार्य करताना अडचणी आल्या तरी चांगल्या माणसांची साथ घेऊन वाटचाल सुरू ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. बाळासाहेब बलवंत यांनी करून दिला. पारितोषिक वाचन प्रा. डॉ. सुशील शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी बावचकर आणि प्रा. कुबेर गायकवाड यांनी केले.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे अमरजित पाटील, डॉ. राजेंद्र जाधव, गणेश पाटील, ज्योतीराम भायगुडे, माजी प्राचार्य डी. जे. साळुंखे, शिवशंकर विरपे आणि प्रा. डॉ. आनंद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता साळवे यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Post Views: 7