सोलापूर : दमानी नगरातील श्रद्धा महिला मंडळाच्यावतीने गड दर्शन समाज मंदिरात सुरू असलेल्या ह. भ. प. भालचंद्र महाराज केजकर यांच्या शिव महापुराण कथेप्रसंगी रविवारी सायंकाळी साक्षात श्री.शंकर आणि पार्वती यांच्या विवाह सोहळ्याने अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. हजारो शिवभक्तांच्या साक्षीने विवाह सोहळा पार पडला.दिया धूत हिने भगवान शंकराची तर आरोही कराळे हिने पार्वती मातेची वेशभूषा परिधान केली होती.
भालचंद्र महाराजांनी शिव – पार्वती यांच्या विवाहाची रंजक कथेचे वर्णन करताना सांगितले, माता पार्वती आणि महादेव यांचं प्रेम एका जन्माचे नव्हे तर जन्मोजन्मीचे होते. माता पार्वतीने भगवान शिवाला आपले पती मानले होते. भोलेनाथ यांच्याशीच विवाह होईल असा त्यांचा निर्धार होता. देवदेवत्यांनासुधा तेच हवे होते. माता पार्वती यांनीसुद्धा त्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. यामुळे तिन्ही लोकात हाहाकार माजला. भोलेनाथ पार्वतीच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि लग्नाला होकार दिला.
शंकराची अनोखी वरात निघाली. शिवाने अत्यंत मोहक आणि सुंदर नवरदेवाचे रूप धारण केले होते. सृष्टीचे निर्माते भगवान ब्रह्मदेवाच्या साक्षीने मंगलमय वातावरणात शंकर आणि पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. शिव – पार्वती यांचा विवाह त्याग, समर्पण आणि आदर्श संसाराचे प्रतीक मानला जातो, असेही भालचंद्र महाराजांनी यावेळी बोलताना सांगितले.
श्रद्धा महिला मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री शिव महापुराण कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शिवनामाच्या गजराने आणि भक्तिरसाने परिसर भारावून गेला आहे.
यावेळी श्रद्धा महिला मंडळाच्या सदस्या जयश्री पिंगळे, रजनी कुलकर्णी, शोभा बिडला, सुमित्रा स्वामी, अलका गवळी, शिला थिटे, पुष्पा होळकर, वैशाली शेटे, उज्वला कुलकर्णी, मृदुला बाद्रायणी, सुनंदा म्हेत्रे, जयमाला रजपूत, निर्मला कराळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.