बार्शी – नवीन मराठी शाळेत केंद्र शासनाच्या ‘ई-कचरा संकलन व जबाबदार विल्हेवाट’ या विशेष मोहिमेअंतर्गत ई-कचरा जनजागृती उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रण याबाबत जागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम आगवणे होते. यावेळी शाळेतील सहशिक्षक श्री. उमेश नायकुडे आणि श्री. कुलदीप काकडे यांनी इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना ई-कचऱ्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
मोबाईल, चार्जर, संगणक, की-बोर्ड, वायर तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यायोग्य राहिली नसल्यास त्यांच्यापासून ई-कचरा निर्माण होतो. हा कचरा सामान्य कचऱ्यात टाकणे किंवा जाळणे पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे ई-कचरा वेगळा जमा करणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू शक्य असल्यास दुरुस्त करून पुन्हा वापरणे आणि जमा केलेला ई-कचरा अधिकृत संकलन केंद्राकडे देणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
उपक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी पर्यावरण संरक्षणाची प्रतिज्ञा घेतली. ई-कचरा सामान्य कचऱ्यात न टाकणे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा जबाबदारीने वापर करणे, ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि आपल्या कुटुंबीयांसह समाजात याबाबत जनजागृती करणे, असा संकल्प यावेळी करण्यात आला. पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच पर्यावरणपूरक सवयी रुजविणे हा या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश होता.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्योती बगले यांनी केले. या उपक्रमास शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.