सोलापूर – जिल्हा परिषदेत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवाटपावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये निर्माण झालेला वाद आता सोळाव्या वित्त आयोगाच्या निधीवाटपाच्या माध्यमातून मिटविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आगामी काळात सोळाव्या वित्त आयोगाचा निधी सर्व सदस्यांना समान पद्धतीने वितरित केला जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी दिली. भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या मित्रपक्षांना नाराज ठेवणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवाटपावरून जिल्हा परिषदेतील सत्ताधारी महायुतीमध्येच मतभेद उफाळून आले होते. निधीवाटपात भाजपच्या सदस्यांना झुकते माप दिले जात असल्याचा आरोप करीत मित्रपक्षांच्या सदस्यांनी सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे सत्ताधारी गटातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली होती. विरोधकांऐवजी मित्रपक्षांकडूनच सत्ताधाऱ्यांना जाब विचारला जात असल्याने हा विषय राजकीयदृष्ट्या चर्चेचा ठरला होता.
या पार्श्वभूमीवर अध्यक्ष दीपक वैद्य यांनी समन्वयाची भूमिका घेत आगामी निधीवाटपाबाबत महत्त्वाचे आश्वासन दिले आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवाटपाचा विषय आता संपला असून, सोळाव्या वित्त आयोगाच्या निधीचे वाटप सर्व सदस्यांना समान न्याय देणारे असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सध्याच्या नाराजीवर भविष्यातील निधीवाटपातून तोडगा काढण्याचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.
राज्याच्या सत्तेत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे पक्ष एकत्रितपणे काम करीत आहेत. त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेतही महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय कायम राहणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी निवडीवेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेला शब्द पाळला जाईल, असेही वैद्य यांनी सांगितले.
दरम्यान, निधीवाटपातील समानतेच्या आश्वासनामुळे महायुतीतील मित्रपक्षांची नाराजी कितपत दूर होते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. केवळ आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष निधीवाटपातही समानतेचे सूत्र राबविले जाते का, याकडे जिल्हा परिषद सदस्यांचे लक्ष लागले आहे.
पर्यायी राजकीय हेडिंग
चौकट
पंधरावा वित्त आयोगाचा निधीवाटपाचा तिढा तूर्तास कायम; मुंबईतील बैठक तीन दिवसांसाठी पुढे
जिल्हा परिषदेत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवाटपावरून सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षांमध्ये निर्माण झालेला वाद तूर्तास कायम राहणार आहे. भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांना प्रत्येकी ९० लाख, तर अन्य मित्रपक्षांच्या सदस्यांना ४५ लाख रुपये निधी देण्याच्या कथित सूत्रावरून शिंदेसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बुधवारी (दि. २५) होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली असून, आता तीन दिवसांनंतर यासंदर्भात चर्चा होणार आहे. त्यामुळे निधीवाटपाचा तिढा सुटण्याऐवजी राजकीय चर्चेला आणखी अवधी मिळाला आहे.
Views: 10