सोलापूर : सोलापूरकरांच्या अनेक वर्षांच्या पाणीप्रश्न सोडविण्यासाठी १ हजार ३५० कोटी ६७ लाख रुपयांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाच्या उच्चस्तरीय बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या योजनेतील ८० कोटी रुपयांच्या सौरऊर्जा प्रकल्पामुळे वीजपुरवठा खंडित झाला तरी पाणीपुरवठा यंत्रणा सुरू ठेवणे शक्य होणार असून, सोलापूरकरांना अखंडितपणे दररोज २४ तास पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास महापौर विनायक कोंड्याल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
माझ्या महापौरपदाच्या कार्यकाळात या ऐतिहासिक योजनेला मंजुरी मिळाल्याचा मनस्वी आनंद आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह इतर आमदार पदाधिकारी आणि प्रशासनाचे आभार मानतो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, योजनेला मंजुरी मिळाल्याच्या आनंदात महापालिकेत आनंद साजरा करण्यात आला. महापौर विनायक कोंड्याल आणि पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेविका रोहिणी तडवळकर, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला जंगम, विधी समिती सभापती सत्यजित वाघमोडे, राजशेखर पाटील, श्रीनिवास दायमा, नगरसचिव प्रवीण दंतकाळे, किरण पवार यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते.
महापौर विनायक कोंड्याल पुढे म्हणाले,
सोलापूरकरांना दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन निवडणुकीच्या अजेंड्यात दिले होते. त्यादृष्टीने शासनस्तरावर आणि महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, मित्राचे सीईओ प्रवीण परदेशी, सचिव अग्रवाल तसेच महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या प्रयत्नांमुळे या योजनेला मंजुरी मिळाल्याचे महापौरांनी सांगितले.
या योजनेअंतर्गत शहरात सुमारे १२०० किलोमीटर लांबीची नवीन पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. पाणी साठवणूक आणि वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी ३० नव्या एमबीआर टाक्या उभारण्यात येणार आहेत. एकूण १५० एमएलडी पाणी साठवण क्षमतेची व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. तसेच पाणीपुरवठ्याच्या बिलामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शहरातील सुमारे २ लाख ३८ हजार नळजोडण्यांना स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत.
आमदार कोठेंचा फेटा न बांधण्याचा पण पूर्णत्वाकडे!
सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर होईपर्यंत आणि शहराचा पाणीप्रश्न सुटेपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही, असा पण आमदार देवेंद्र कोठे यांनी केला होता. या योजनेसाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, शासनाचे अधिकारी आणि महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर योजनेला मंजुरी मिळाल्याने त्यांचा पण पूर्णत्वाकडे जात आहे. यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांचेही मी आभार मानतो, असे महापौर कोंड्याल यांनी आवर्जून नमूद केले.
८० कोटींचा सौरऊर्जा प्रकल्प; वीजबिलात बचत
पाणीपुरवठा सुरू असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास पंपिंग यंत्रणा बंद पडून पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. ही अडचण दूर करण्यासाठी योजनेत सुमारे ८० कोटी रुपयांचा सौरऊर्जा प्रकल्प समाविष्ट करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी ऊर्जा उपलब्ध होऊन पाणीपुरवठा यंत्रणा सुरू ठेवण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या वीजबिलात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत बचत होण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, या योजनेसाठी सोलापूरकरांवर कोणताही अतिरिक्त अथवा वाढीव कर लादला जाणार नाही, असे महापौरांनी स्पष्ट केले.
येत्या २८ तारखेला दिल्ली येथे सामंजस्य करार
येत्या २८ तारखेला दिल्ली येथे वर्ल्ड बँकेसोबत या प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार (एमओयू) करण्यात येणार आहे. सोलापूरच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.
Views: 14