बार्शी – गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बार्शी शहरातील माझ्या प्रभाग क्रमांक ११ मधील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नगरसेवक नवनाथ माळगे यांनी बार्शी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. गणेशोत्सवापूर्वी कार्यवाही न झाल्यास नगरपरिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
बार्शी शहरातील वीर सावरकर चौक ते पटेल चौक या मार्गावर दरवर्षी परंपरेने गणेशमूर्ती, गणेशोत्सवाचे साहित्य, झेंडे, हार-माळा तसेच गौरी-महालक्ष्मीचे मुखवटे, हात व सजावटीच्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर स्टॉल उभारले जातात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात या परिसरात शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गर्दी होते.
मात्र, या परिसरात ये जा करण्यासाठी असलेल्या पटेल चौक–कापड बाजार–पांडे चौक, गवळी गल्ली–मदिना मशीद, पानखुंट–सराफ बाजार–हळद गल्ली–सोमवार पेठ तसेच पटेल चौक–पानखुंट या प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून दुचाकीस्वार, महिला, ज्येष्ठ नागरिक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे.
याबाबत सभागृहात चर्चा तसेच प्रत्यक्ष भेटी आणि लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधूनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचे माळगे यांनी निवेदनात म्हटले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी गर्दी लक्षात घेता उत्सव सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून सर्व खड्डे बुजवावेत व आवश्यक ठिकाणी डागडुजी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरपरिषदेने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा माळगे यांनी दिला आहे.