सोलापूर : सात रस्ता येथील महापालिका परिवहन उपक्रमाच्या बस डेपोत बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक आग लागली. डेपोच्या मागील बाजूस स्क्रॅप करून ठेवलेल्या एका भंगार बसला लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आगीची झळ लागून शेजारील आणखी दोन अशा एकूण तीन बसेस जळून नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या चार मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे अच्युतराव दुधाळ यांच्यासह जवानांनी तातडीने आग विझविण्याचे काम सुरू केले. चार अग्निशमन बंबांच्या मदतीने पाण्याचा मारा करून अवघ्या १० ते १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अग्निशमन दलाचे प्रमुख राकेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली. आग इतर बसेसपर्यंत पसरणार नाही, याची दक्षता जवानांनी घेतल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी घटनास्थळी आग बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
सात रस्ता बस डेपोच्या मागील बाजूस महापालिका परिवहन उपक्रमाच्या बंद पडलेल्या आणि भंगार घोषित केलेल्या बसेस ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीन बसेस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, तीन बसेसचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
दरम्यान, बस डेपोमध्ये मोठ्या संख्येने भंगार बसेस ठेवण्यात आल्या असून या बसेस अन्य ठिकाणी हलविण्याबाबत महापालिका प्रशासनाचा विचार सुरू आहे, अशी माहिती महापालिका परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक व्यंकटेश गुडसेलू यांनी दिली.
—–
Views: 11