बार्शी – राज्य शासनाकडून बार्शी बस स्थानकाला प्राप्त झालेल्या नवीन पाच बसेसचे लोकार्पण आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते झाले. बार्शी बस स्थानकात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आमदार राऊत यांनी नवीन एस टी बसचे पूजन केले.
यावेळी आमदार राऊत म्हणाले, बार्शी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. श्री भगवंत तीर्थक्षेत्र, व्यापार पेठ, शैक्षणिक व आरोग्याच्या सोयीसुविधा यामुळे बार्शी शहरात प्रवाशांची नेहमीच मोठी वर्दळ असते. एस.टी.च्या साहाय्याने प्रवासी मोठया संख्येने प्रवास करत असल्याने साहजिकच बार्शी आगारात देखील प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. येथे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी बार्शी आगाराचे नुतनीकरणाचे काम देखील सुरु आहे. बार्शी आगार हे नफ्यात असणारे आगार आहे. बार्शी आगारात सुमारे शंभरेक बसेस आहेत परंतु यातील अनेक बसेस जुन्या झाल्या असल्याने रस्त्यात बंद पडणे असे प्रकार सातत्याने घडू लागले होते. त्यामुळे आगाराला नव्या बसेस मिळणे गरजेचे होते. त्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे नवीन बस मिळाव्यात यासाठी पाठपुरावा केला. यापूर्वी पहिल्या टप्प्यात नव्या ५ बस मिळाल्या आहेत. आज आणखी नवीन ५ बस मिळाल्या व नजीकच्या काळात आणखी १० नवीन बस मिळण्यासाठी देखील आपले प्रयत्न सुरु आहेत. नवीन बसेसमुळे प्रवास अधिक सुखद होण्यास मदत होणार आहे. राज्य सरकार महामंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी देखील महामंडळाला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. सर्वांच्या प्रयत्नातून एस. टी. महामंडळाला उर्जितावस्था येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Views: 11