सोलापूर : पावणे दोन वर्षांपूर्वी सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्यात तब्बल २ हजार किलोमीटर अंतर पार करून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून अल्पवयीन मुलगी व आरोपी ओम संजय साबळे याला ताब्यात घेतले. ही कारवाई ५ सप्टेंबर रोजी पहाटे भाईपुरा, हटकेश्वर, सुशिला बेणी चाळ, अहमदाबाद येथे करण्यात आली.
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सदर बझार पोलीस ठाण्यात २५ डिसेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीला आरोपी ओम संजय साबळे याने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार होती.
सदर गुन्ह्यातील अल्पवयीन बालिका व आरोपी यांचा सदर बझार पोलीस ठाण्याच्या तत्कालीन तपासी अंमलदारांनी प्रयत्न करून शोध घेतला. मात्र, ते मिळून न आल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा २१ एप्रिल २०२५ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, सोलापूर शहर येथे वर्ग करण्यात आला.तपासी अधिकारी व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी कौशल्यपूर्ण तपास करीत तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी व अल्पवयीन बालिकेचा शोध घेतला. मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पथकाने अहमदाबाद, गुजरात येथे जाऊन ५ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे २.२० वाजता भाईपुरा, हटकेश्वर, सुशिला बेणी चाळ येथून आरोपी ओम संजय साबळे व अपहृत बालिकेला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी त्यांना ७ सप्टेंबर २०२६ रोजी सदर बझार पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
ही कामगिरी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस निरीक्षक स्नेहा म्हेतर, ग्रेड पीएसआय अलका शहापुरे, पोलीस नाईक अ. सत्तार पटेल, चालक पोलीस शिपाई दादा गोरे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रकाश गायकवाड व पोलीस हवालदार मच्छिद्र राठोड यांनी पार पाडली आहे .
Post Views: 9