सांगली जिल्ह्य़ातील मिरज येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत गुंटूक पती पत्नीने सहभाग नोंदविला असून या स्पर्धेत 45 वर्षे वरील पुरुष गटात केशव गुंटूक यांनी 4 किमी मध्ये द्वितीय क्रमांक तर वैशाली केशव गुंटूक यांनी 45 वर्षाखालील महिला गटात 3 किमी मध्ये तृतीय क्रमांक पटकावून सर्वांना अचंबित तर केलेच शिवाय या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हा खरोखरच एक उत्तम खेळाडू असल्याचे सुंदर उदाहरण दिले आहे. ही क्रॉस कंट्री स्पर्धा अत्यंत खडतर व उंच डोंगरी भागात होते. शिवाय यावेळी मुसळधार पाऊस व दाट धुक्यामुळे स्पर्धा अत्यंत रोचक होते. या स्पर्धेतील रस्त्याचे वैशिष्टय़ म्हणजे हा रस्ता चिखल, कच्चा रस्ता, मोठमोठे खड्डे, कडा डोंगर चढणे व डोंगर उतरताना मात्र अत्यंत गुंतागुंतीचा जंगलातून मार्ग काढत बाहेर पडणे खूपच आव्हानात्मक होते. इतके अवघड क्रॉस कंट्री स्पर्धा एकमेव सांगली जिल्ह्य़ात आयोजित केला जातो. या वेळी विविध राज्यांतील हजारो स्पर्धक उपस्थित होते. पुण्याचे क्रिडा उपसंचालक श्री. युवराज नाईक यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गुंटूक दाम्पत्यांना प्रमाणपत्र, मेडल व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माणिक वाघमारे (क्रीडा उपसंचालक बालेवाडी, पुणे), सुहास व्हनमाने (जिल्हाक्रीडाअधिकारी, पालघर), क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. संदीप कोकाटे व पंडित व्हनमाने यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच महाकाली स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष, सांगली व कोल्हापूर येथील मान्यवर उपस्थित होते. गुंटूक दाम्पत्याचा क्रिडा क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.
Post Views: 7