मंगळवेढा – पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निरागस चिमुरडीवर ६५ वर्षीय नराधमाने केलेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचा ज्वालामुखी फाटला आहे. या विकृत कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी मंगळवेढ्यातूनही क्रांतीचे रणशिंग फुंकले गेले असून, महर्षी वाल्मिकी संघ, मंगळवेढा शहर यांच्या वतीने आरोपीला तात्काळ आणि कठोरतम शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या भीषण घटनेवर अत्यंत आक्रमक भूमिका मांडताना मंगळवेढा शहर अध्यक्ष अरविंद नाईकवाडी यांनी सरकारला ठणकावून सांगितले की, “ज्या नराधमाने एका चिमुकलीचे आयुष्य कोळपून टाकले, त्याला कायद्याच्या पळवाटा शोधण्याची संधीच मिळता कामा नये. अशा हैवानांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, तरच उद्याच्या पिढ्या सुरक्षित राहतील.”महर्षी वाल्मिकी संघ आणि अरविंद नाईकवाडी यांच्या प्रमुख मागण्या:फास्ट ट्रॅक खटला आणि फाशी: या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून एका महिन्याच्या आत नराधमाला फासावर लटकवावे.
अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती: सरकारने या केससाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी.आक्रमक आंदोलनाचा इशारा: जर १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल झाले नाही आणि आरोपीला कडक शासन झाले नाही, तर महर्षी वाल्मिकी संघ संपूर्ण मंगळवेढा शहरासह जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन छेडेल.घटनेचे गांभीर्य:आरोपी भीमराव कांबळे याने निरागस मुलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिची दगडाने ठेचून हत्या करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवला होता. “अशा क्रूर गुन्हेगाराला समाजात स्थान नाही. जर न्याय मिळण्यास उशीर झाला, तर लोकांचा संयम सुटेल,” असा इशारा अरविंद नाईकवाडी यांनी दिला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण राज्यात महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, मंगळवेढ्यातील वातावरण अत्यंत संतप्त आहे


























