सोलापूर – बदलती जीवनशैली, वाढता मानसिक ताणतणाव, दीर्घकाळ बसून काम करण्याची पद्धत आणि वेळेअभावी आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेऊन सोलापूर बार असोसिएशन, सोलापूरच्या वतीने सर्व वकील सभासदांसाठी आरोग्य जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार, दि. 17 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत सोलापूर बार असोसिएशन हॉल येथे अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश वकील बांधवांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणे, आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित करणे हा होता. कार्यक्रमात सहभागी झालेल्या वकील सभासदांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमात आरोग्यम धनसंपदा या नामांकित संस्थेच्या अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शक व समुपदेशकांनी उपस्थित राहून वकील सभासदांची वैयक्तिक आरोग्य तपासणी केली. यामध्ये वजन कमी करणे , वजन वाढवणे, शरीरातील ऊर्जा व ताजेपणा वाढवणे, स्नायू बांधणी, त्वचा आरोग्य व सुधारणा, हाडे व सांधे यांचे आरोग्य, हृदय विकारांची प्रतिबंधक काळजी तसेच पचनसंस्था व योग्य आहार व्यवस्थापन या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित तज्ज्ञांनी प्रत्येक सभासदास त्यांच्या जीवनशैलीनुसार वैयक्तिक सल्ला व आवश्यक उपाययोजना सुचविल्या.
याचे उद्घाटन सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ वकील ॲड. व्ही. एस. आळंगे यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ वकील ॲड. संजीव गायकवाड, ॲड. असीम बांगी, ॲड. जाहीर दर्जी, ॲड. तुकाराम चिंचोळी, ॲड. मळसिद्ध देशमुख तसेच अनेक मान्यवर ज्येष्ठ व कनिष्ठ वकील उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ वकील ॲड. व्ही. एस. आळंगे यांनी आपल्या मनोगतात “आरोग्य हीच खरी संपत्ती असून व्यावसायिक यशासाठी सुदृढ शरीर आणि सकारात्मक मानसिकता आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले. तसेच सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव यांनी वकील बांधवांच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्य राखले जाईल, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमात आरोग्यम धनसंपदा संस्थेचे तज्ज्ञ सुधीर कुलकर्णी, सुरज पाटील, राहुल पाटील, जयश्री डोंगरे व भारत साठे यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक सखोल माहिती देत मार्गदर्शन केले. सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने उपस्थित सर्व तज्ज्ञांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सोलापूर बार असोसिएशनचे खजिनदार ॲड. अरविंद देडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे यांनी प्रभावीपणे केले.


















