वळसंग – तालुका दक्षिण सोलापूर येथे वळसंग टोल नाका परिसरात असलेल्या मोठ्या हॉटेल्सना एचपी गॅसचे सिलिंडर सहज उपलब्ध होत असताना, दुसरीकडे गावातील सामान्य नागरिकांना मात्र पंधरा दिवसापासून गॅससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या अन्यायामुळे वळसंगमधील नागरिक संतप्त झाले असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.नेमका प्रकार काय? वळसंग टोल नाका हा मुख्य रस्त्यावर असल्याने येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि वाहतूक असते. येथील अनेक हॉटेल्समध्ये व्यावसायिक गॅसचा वापर होणे अपेक्षित असताना, अनेक ठिकाणी घरगुती सिलिंडरचा साठा मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
हॉटेल्सना प्राधान्य: टोल नाक्यावरील हॉटेल्सना नियमितपणे गॅस पुरवठा होत असल्याने त्यांचे कामकाज सुरळीत सुरू आहे.नागरिकांचे हाल: गावातील ग्राहकांनी गॅस बुकिंग करून १५-२० दिवस उलटले तरी त्यांना गॅस मिळत नसल्याची ओरड आहे. अनेक महिलांना पुन्हा लाकडी चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.
काळा बाजार सुरू असल्याची शक्यता: “हॉटेल्सना जादा दराने गॅस विकून एजन्सी चालक सामान्य नागरिकांचा हक्क हिरावून घेत आहेत का?” असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.नागरिकांचा इशारा एचपी गॅस एजन्सीच्या या मनमानी कारभारामुळे गावातील सर्वसामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. गावातील या एचपी गॅस तुटवड्याची ग्रामपंचायत सरपंच व इतर सदस्यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना सूचित करून यावर उपाययोजना केले नाही तसेच येत्या काही दिवसांत गावातील घरगुती गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही, तर ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.


















