सोलापूर : विजापूर रोड येथील इंचगिरी मठातील गोधन विकास गोशाळेत JSG सेंट्रलच्या सदस्यांनी दिलेल्या देणगीतून 23 गोमातांच्या निवाऱ्यासाठी उभारण्यात आलेल्या पत्राशेडचे उद्घाटन देणगीदारांच्या हस्ते भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी गोमातेचे विधिवत पूजन करून हिरवा चारा अर्पण केला. यावेळी गोसेवा, गोसंवर्धन आणि भारतीय संस्कृतीतील गोमातेचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्यात आले. गोसेवा ही केवळ धार्मिक परंपरा नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश उपस्थितांनी दिला.
या कार्यक्रमास जैन सोशल ग्रुप सेंट्रलचे संस्थापक केतन शहा, देणगीदार मोहन लोढा, वैशाली कुलकर्णी, पुष्पलता ताई महाराज (इंचगिरी मठ), वरुण कुलकर्णी, डॉ. पारपल्लीवार, राजेश वडी शेरला आणि शुभम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी गोसंवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. अशा सेवाभावी उपक्रमांमुळे गोशाळांना बळ मिळण्याबरोबरच समाजात करुणा, सेवाभाव आणि पर्यावरणपूरक जीवनमूल्ये अधिक दृढ होतात, असे त्यांनी सांगितले.
गोधन विकास गोशाळा व्यवस्थापनाने JSG सेंट्रलच्या सदस्यांसह सर्व देणगीदारांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच अधिकाधिक नागरिक, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी गो प्रॉडक्ट खरेदी करून वापरावे व गोसेवेसाठी पुढे येऊन अशा उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहन केतनभाई शहा यांच्याकडून करण्यात आले.


















