सोलापूर : शेळगी येथे सुमारे दीडशे वर्षांपासून अखंडपणे जपली गेलेली कारहुणवी (बैलपोळा) परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी होणार असून, या पारंपरिक सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमच केरळ राज्यातील सुप्रसिद्ध चेंडामिलन कोंगनोळी’ वाद्यपथक आणि ‘कांतारा’ नृत्याविष्काराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव धार्मिक परंपरेबरोबरच सांस्कृतिक वैभवाचा अनोखा संगम ठरणार आहे.
शेळगीचे माजी पोलीस पाटील जगदीश मल्लिकार्जुन पाटील यांच्या घराण्याकडून ही कारहुणवीची परंपरा गेल्या सुमारे १५० वर्षांपासून अविरतपणे जपली जात आहे. गावातील शेतकरी, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा वर्षानुवर्षे अधिक भव्य होत असून, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा उत्सव म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे.
कारहुणवीच्या दिवशी मानाच्या बैलजोड्यांना आकर्षक साज चढवून पाटील यांच्या निवासस्थानी गाय व बैलजोड्यांची विधिवत पूजा केली जाते. त्यांना नैवेद्य व खाद्य अर्पण करून कृषी संस्कृतीप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यानंतर दुपारी चार वाजता पाटील वाड्यासमोर मानाच्या पाच ते सहा बैलजोड्यांना पारंपरिक बाशिंग चढविण्याचा विधी पार पडतो.
यानंतर सवाद्य आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीमध्ये विविध राज्यांतील कलाकार सहभागी होत आपापल्या पारंपरिक कलांचे सादरीकरण करतात. मार्गावरील सुवासिनी बैलजोड्यांना नैवेद्य अर्पण करतात तसेच मानकरी जगदीश पाटील यांचे औक्षण करतात. गावातील विविध मंदिरांना प्रदक्षिणा घातल्यानंतर वेशीवर पारंपरिक पद्धतीने मानाचा कर तोडून सोहळ्याची सांगता केली जाते. याप्रसंगी पाटील घराण्याच्यावतीने गावातील शेतक//ऱ्यांचा सन्मान करण्याची परंपराही आजतागायत कायम आहे.
दरवर्षी या मिरवणुकीसाठी विविध राज्यांतील पारंपरिक वाद्यपथके निमंत्रित केली जातात. त्यामुळे स्थानिक लोककलेबरोबरच देशातील विविध सांस्कृतिक परंपरांचा संगम शेळगीमध्ये अनुभवायला मिळतो. परिसरातील हजारो नागरिक या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात.
यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे सोमवार, २९ जून रोजी दुपारी २ वाजल्यापासून शेळगी गावठाण येथे आयोजित करण्यात आलेला केरळच्या सुप्रसिद्ध //’चेंडामिलन कोंगनोळी’ वाद्यपथकाचा भव्य कार्यक्रम आणि दक्षिण भारतातील लोकप्रिय //’कांतारा’ नृत्याविष्कार. दमदार तालवादन, पारंपरिक वेशभूषा, आकर्षक रंगभूषा आणि थरारक सादरीकरणामुळे हा कार्यक्रम सोलापूरकरांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम होत असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. पारंपरिक कला, लोकसंस्कृती आणि ग्रामीण परंपरेचा संगम अनुभवण्यासाठी नागरिकांनी कुटुंबीय व मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. शैलेश पाटील यांनी केले आहे.
Post Views: 10