सोलापूर : सोशल असोसिएशन उर्दू प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षिका कुदसिया एजाज मनियार यांचा सेवानिवृत्ती निमित्त आयोजित निरोप समारंभ उत्साहात व भावपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल ३५ वर्षे सहशिक्षिका म्हणून सेवा बजावलेल्या मनियार यांच्या कार्याचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मौलाना आझाद उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक इरफान केरूल हे होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक डॉ. आसिफ इक्बाल, शिक्षिका कुदसिया मनियार, शरीफ भागनगरी आदी उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मनियार यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या सेवेला प्रेरणादायी व विद्यार्थ्यांसाठी आदर्श असल्याचे नमूद केले.
प्रास्ताविक डॉ. आसिफ इकबाल यांनी केले. त्यांनी मनियार यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेत त्यांना एक समर्पित, कर्तव्यदक्ष व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असलेल्या आदर्श शिक्षिका म्हणून गौरविले.
आपल्या मनोगतात कुदसिया मनियार यांनी शिक्षक म्हणून मिळालेला सन्मान हा “या जगातच स्वर्ग प्राप्त झाल्यासारखा” असल्याची भावना व्यक्त केली. तसेच त्यांनी संस्थेचे संस्थापक दिवंगत डॉ. मोहम्मद अली वडवान यांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या कार्यकाळातील अनुभव कथन केले. यावेळी त्यांनी मुख्याध्यापक डॉ. आसिफ इकबाल यांच्यावर स्वतः रचलेले गीत तालबद्ध सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यामध्ये निरोप समारंभमध्ये गुलशन खान, रिजवानाप्यारे, शबाना काझी,रेहाना शेख तसेच मनीयार यांचे भाऊ रेल्वे विभागातून सेवानिवृत्त अमीर खुसरो होटगी , शरीफ भागनगरी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात शहजादी महसूलदार यांनी नात सादर केली तर शबाना काझी यांनी हम्द पठण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोईज सिराज अहमद तर आभार अनीसा नालबंद यांनी मानले.

























