पुणे : अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणने सलग दुसऱ्या दिवशीही दबदबा ठेवत अजिंक्यपदाकडे वाटचाल सुरु केली आहे. यामध्ये महावितरणच्या खो-खोच्या महिला संघाने विजेतेपद मिळवले आहे. तर कबड्डीमध्ये उपांत्य फेरीत तर खो-खो व बास्केटबॉलमध्ये पूर्वउपांत्य फेरीत महावितरणच्या संघाने प्रवेश केला आहे.
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत गुरुवारी (दि. ७) खो-खोच्या महिला गटात महावितरण विरुद्ध राजस्थान असा अंतिम फेरीचा सामना झाला. यात महावितरणच्या कर्णधार भाग्यश्री फडतरे, सारिका जाधव, श्रेया जाधव, मोनिका भोसले यांनी आक्रमण व संरक्षणामध्ये दमदार कामगिरी करीत सामन्यावरील वर्चस्व कायम ठेवले. पहिल्या डावात १२ विरुद्ध ५ गुणांची आघाडी घेत दुसऱ्या डावात महावितरण संघाने सहा मिनिटे राखून खो-खोचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. तर राजस्थानला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
खो-खोच्या पुरुष गटामध्ये महावितरण संघाने (१५) हरियाणा संघाचा (४) ११ गुणांनी सहज पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र राजस्थान (६) विरुद्ध महापारेषण (५) संघात तुल्यबळ लढत झाली व राजस्थानने एक गुणाने निसटता विजय मिळवला. आता महावितरण विरुद्ध महापारेषण आणि हरियाणा विरुद्ध राजस्थान अशी अंतिम फेरीसाठी लढत होणार आहे. भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर याच्यासह निशिकांत शिंदे, विराज कोटमकर, महेंद्र पाटील यांनी आक्रमण व संरक्षणामध्ये सातत्य कायम ठेवले असून सर्व साखळी सामन्यांत वर्चस्व मिळवले आहे. महापारेषणचा उत्कृष्ट खेळाडू विशाल सावंत व इतर सहकाऱ्यांवर आता बलाढ्य महावितरण संघाचा पराभव करण्याचे आव्हान आहे.
कबड्डीच्या पुरुष गटामध्ये पूर्वउपांत्य फेरीत बीएसईएस राजधानी दिल्ली संघ (४९) विरुद्ध महापारेषण (३९) यांच्या अतिशय अटीतटीची लढत झाली. केवळ तीन गुणांनी महापारेषणला पराभव पत्कारावा लागला. दिल्लीच्या संजीव छिकारा, हरदेव शर्मा, रवी प्रकाश व अनिल यांनी आक्रमक पवित्रा घेत महापारेषणचे शेवट्या मिनिटापर्यंत सुरु असलेले आक्रमण थोपवून धरले. यानंतर हिमाचल प्रदेश संघाने (३२) मध्यप्रदेश पॉवर मॅनेजमेंट संघाचा (७) सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली. तर महावितरण संघातील (३०) दीपक माने, अमित जाधव, नीलेश ठाकूर, अभिषेक नर, अजय शिंदे यांच्या आक्रमक पवित्र्याने तेलंगणा ट्रान्समिशन संघाचा (११) १९ गुणांनी आणि हरियाणा संघाने (४८) टाटा पॉवर मुंबई संघाचा (१७) पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
बास्केटबॉलच्या साखळी सामन्यांनी या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी रंगत वाढली. यात महावितरण (३४) विरुद्ध तेलंगणा (२४) लढतीत महावितरणच्या पंकज गेडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेता शत्रुघ्न गोखले, आशिष खानापुरे यांनी सामन्यावर नियंत्रण ठेवत विजय मिळवला. यासोबतच सुरजितसिंग, हरप्रितसिंग, सतेंदरसिंग यांच्या आक्रमणामुळे पंजाब संघाने (२१) उत्तराखंड संघाचा (८) पराभव केला. तर हरियाणा संघ (५४) विरुद्ध महापारेषण (६) लढतीत हरियाणाने एकतर्फी विजय मिळवला.
फोटोओळ –खो-खोच्या अंतिम सामन्यात भाग्यश्री फडतरे, सारिका जाधव, श्रेया जाधव, मोनिका भोसले यांच्या आक्रमण व संरक्षणामुळे महावितरण संघाने राजस्थानचा पराभव करीत विजेतेपद मिळवले.

























