सोलापूर – घराला स्वर्ग बनवा, जग आपोआप स्वर्ग बनेल असे सांगताना मन शांत असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी जीवन सुंदर बनू शकते. कठीण प्रसंगात संयम राखणे आणि प्रत्येक परिस्थितीत सकारात्मकता शोधणे ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. मनातील विचार बदलले की माणसाचे जगण्याचे दृष्टिकोन बदलतात आणि जगण्याचा आनंदही द्विगुणित होतो. ” सरल मन , साधे जीवन आणि सकारात्मक विचार ” आनंदी जीवनाचा खरा मूलमंत्र आहे.अध्यात्म म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर स्वतःच्या मनाची ओळख करून घेणे, आत्मिक शक्ती वाढवणे आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागणे होय, असे विचार ब्रह्माकुमारी शिवानीदीदीं यांनी मांडले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सोलापूर यांच्यावतीने गुरुवारी सायंकाळी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर ” सरल मन ,सरल जीवन ” या विषयवार आंतरराष्ट्रीय वक्त्या आणि राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी हजारो श्रोत्यांना मार्गदर्शन करताना शिवानीदीदी बोलत होत्या .
आजच्या धावपळीच्या युगात माणसाकडे पैसा, प्रतिष्ठा, सुखसोयी आणि आधुनिक तंत्रज्ञान आहे; मात्र मनःशांतीचा अभाव जाणवतो. प्रत्येकाच्या आयुष्यात अपेक्षा, स्पर्धा, चिंता, ताणतणाव, मतभेद आणि नात्यांमधील गुंतागुंत वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत माणसाने स्वतःच्या मनाकडे लक्ष देणे आणि विचारांची दिशा बदलणे गरजेचे असल्याचे शिवानीदीदी यांनी आपल्या आध्यात्मिक विचारांतून स्पष्ट केले .
=== मनःशांती हाच खऱ्या सुखाचा आधार ===
मनःशांती ही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसून ती आपल्या अंतर्मनातील विचारांवर अवलंबून असते. दुसऱ्याने आपल्याशी कसे वागावे, परिस्थिती कशी असावी किंवा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच घडावी, अशी अपेक्षा ठेवली तर मन अस्वस्थ होते. मात्र परिस्थिती स्वीकारण्याची क्षमता निर्माण केली आणि स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवले तर कठीण प्रसंगातही मन शांत राहू शकते,असे विचार शिवानीदीदी यांनी मांडले.
=== आत्मविश्वासाची खरी ताकद स्वतःच्या विचारांत ===
आत्मविश्वास म्हणजे केवळ स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे नव्हे, तर कोणत्याही परिस्थितीत स्वतःला मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवणे होय. अपयश आले म्हणून स्वतःला कमी लेखू नये. चुका झाल्या तर त्यातून शिकावे आणि पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात करावी. दुसऱ्यांच्या मतांवर आपली किंमत ठरवण्याऐवजी स्वतःच्या गुणांची जाणीव ठेवावी, हा महत्त्वपूर्ण संदेश शिवानीदीदी यांनी दिला .
=== नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा आवश्यक ===
कुटुंबातील नातेसंबंध टिकवण्यासाठी अपेक्षांपेक्षा प्रेम, अधिकारापेक्षा आदर आणि वादापेक्षा संवाद महत्त्वाचा आहे. एखाद्याची चूक झाली म्हणून त्याच्याबद्दल मनात कटुता ठेवण्याऐवजी समजून घेण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. माणसाला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या स्वभावात सकारात्मक बदल घडवणे आवश्यक आहे, असे शिवानीदीदी यांनी सांगितले .
=== संयम आणि अध्यात्मातून जीवनाला दिशा ===
रागाच्या क्षणी मौन पाळणे, कठीण प्रसंगात संयम राखणे आणि प्रत्येक परिस्थितीत सकारात्मकता शोधणे ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. अध्यात्म म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर स्वतःच्या मनाची ओळख करून घेणे, आत्मिक शक्ती वाढवणे आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागणे होय, असे त्यांनी सांगितले. जीवनातील खरा आनंद हा बाह्य परिस्थितीत नसून आपल्या अंतर्मनात असतो. मनातील गुंतागुंत कमी करून विचारांमध्ये साधेपणा, वागण्यात नम्रता आणि नात्यांमध्ये प्रेम जपले, तर जीवन निश्चितच सुंदर होऊ शकते. ‘सरल मन, सकारात्मक विचार आणि साधे जीवन’ हाच आनंदी जीवनाचा खरा मूलमंत्र आहे, असा प्रेरणादायी संदेश बीके .शिवानीदीदी यांनी दिला.
———————–
मान्यवरांची उपस्थिती
———————
खासदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम .राजकुमार,भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर ,स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते,शहाजी पवार, अविनाश महागावकर , अमोलराजे भोसले,जयेश पटेल ,प्रदीप शिंगवी , प्रा. केशव शिंदे,नंदा भट्टड , चंद्रिका चव्हाण, बहेन महानंदा , मंगलादीदी, विठ्ठल भाई, दामिनी दीदी, अनिता दीदी, प्रज्ञा दीदी, पूनम दीदी,बाबुभाई मेहता आदी मान्यवर उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. संपूर्ण हरीभाई प्रशालेचे मैदान श्रोत्यांच्या गर्दीने खचाखच भरून गेले होते.
प्रारंभी दामिनीदीदी यांनी गीत गायन केले. त्यानंतर श्रीनी आंबा नृत्यालयाच्यावतीने नृत्य सादर केले. सोलापूरच्यावतीने सोमप्रभादीदी यांनी ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांचे स्वागत केले.
———————–
शिवानीदीदींचा
मोलाचा सल्ला
————————
@ मोबाईल पासून दूर राहा,
@ घर तोडणाऱ्या मालिकांपासून दूर राहा,
@ कुटुंबातील सदस्यांनी एकत्र बसून विचारविनिमय करावा,
@ सोशल मीडियाची अतिरेकी टिकटिक थांबवा ,
@ तणावमुक्त जीवन जगा ,
@ मनशांतीचा मार्ग स्वीकारा,
@ विचारांच्या भडीमारातून स्वतःला बाजूला ठेवा ,